पराभव दिसू लागल्यावर इस्ट बंगाल खेळाडूंचा दंगा

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 10 September 2019

कोलकाता फुटबॉल लीगमध्ये पीअरलेस स्पोर्टस्‌ क्‍लबविरुद्धचा पराभव स्पष्ट दिसू लागल्यावर इस्ट बंगालच्या खेळाडूंनी मैदानात राडा केला.

कोलकाताः कोलकाता फुटबॉल लीगमध्ये पीअरलेस स्पोर्टस्‌ क्‍लबविरुद्धचा पराभव स्पष्ट दिसू लागल्यावर इस्ट बंगालच्या खेळाडूंनी मैदानात राडा केला. त्यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंबरोबर भांडण सुरू केले आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी खेळाडूंनी एकमेकांना धक्काबुक्की केली. 

भरपाई वेळेतील दुसऱ्या मिनिटास इस्ट बंगालच्या सॅंतोसला पीअरलेस गोलरक्षकाने गोल करण्यापासून रोखले. संतापलेल्या सॅंतोसने गोलरक्षकास लक्ष्य केले. गोलरक्षक त्यास प्रत्युत्तर देत आहे, हे पाहिल्यावर इस्ट बंगाल खेळाडूंनी गोलक्षेत्रात धावून आले. त्यांची पीअरलेस खेळाडूंबरोबर बाचाबाची सुरू झाली. पंचांनी हस्तक्षेप केल्यानंतरही प्रतिस्पर्धी एकमेकांना धक्काबुक्की करीत होते, तसेच शिवीगाळ करीत होते. अखेर काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आली. 

पीअरलेसने आपल्या घरच्या मैदानावर ही लढत जिंकल्याचा राग इस्ट बंगाल खेळाडूंना आला होता. या विजयासह पीअरलेसने लीगमध्ये आघाडी घेतली. यापूर्वी त्यांनी मोहन बगानलाही हरवले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: East Bengal players defeat