

ODI World Cup 2023 ENG vs AFG : गतविजेत्या इंग्लंड क्रिकेट संघाला यंदाच्या एकदिवसीय विश्वकरंडकाच्या सलामीच्या लढतीत न्यूझीलंडकडून सपाटून मार खावा लागला. या धक्क्यातून त्यांचा संघ सावरला आणि पुढील लढतीत बांगलादेशचा धुव्वा उडवला.
आता जॉस बटलरच्या नेतृत्वात मैदानात उतरणारा इंग्लंडचा संघ आज नवी दिल्लीत होणाऱ्या लढतीत अफगाणिस्तानशी दोन हात करणार आहे. या लढतीत मोठा विजय मिळवून नेट रनरेट सुधारण्याकडे इंग्लंडचा कल असेल. अफगाणिस्तानच्या संघाला मात्र सलग दोन लढतींमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. आता त्यांचा संघ पराभवाच्या हॅट्ट्रिकपासून दूर राहण्याचा प्रयत्न करील.
डेव्होन कॉनवे व राचिन रवींद्र यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने इंग्लंडला पराभूत केले. या पराभवाला मागे टाकून इंग्लंडने पुढील लढतीत बांगलादेशला १३७ धावांनी धूळ चारली. डेव्हिड मलानची दमदार शतकी खेळी, जॉनी बेअरस्टोची अर्धशतकी खेळी तसेच रीस टॉपली याची प्रभावी गोलंदाजी या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. ज्यो रुटने पहिल्या दोन्ही लढतीत अर्धशतकी खेळी साकारत आपण फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले आहे.
जॉस बटलर, हॅरी ब्रुक व लियाम लिव्हिंगस्टोन या फलंदाजांना अद्याप सूर गवसलेला नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत या तीनही फलंदाजांना चमकदार फलंदाजी करण्याची संधी असणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत इंग्लंडच्या गोलंदाजांना ठसा उमटवता आला नाही, पण बांगलादेशविरुद्धच्या लढतीत इंग्लंडच्या गोलंदाजांनी चमक दाखवली. मोईन अलीऐवजी रीस टॉपली याला संघात घेण्याचा निर्णय सार्थ ठरला. ख्रिस वोक्स, रीस टॉपली, मार्क वूड व अदिल राशीद या गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांना बांधून ठेवले. आता याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी हे गोलंदाज आतुर असतील.
सलामीवीरांचे अपयश
अफगाणिस्तानच्या संघाला सलामीच्या लढतीत बांगलादेशकडून मोठ्या फरकाने हार पत्करावी लागली. त्यानंतर भारताविरुद्धच्या लढतीत त्यांनी २७२ धावा उभारल्या; मात्र त्यानंतरही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अफगाणिस्तानसाठी सलामीवीरांचे अपयश बोचणी देणारे ठरत आहे. रहमानुल्लाह गुरबाज व इब्राहिम झादरन या दोन्ही फलंदाजांना धमक दाखवता आलेली नाही. हाशमतुल्ला शाहिदी व अझमतुल्ला ओमरजाई यांनी भारताविरुद्ध अर्धशतकी खेळी केली. त्यांच्याकडून अशाच कामगिरीच्या पुनरावृत्तीची आशा असेल. गोलंदाजी विभागात एकट्या राशीद खानवर अवलंबून राहून चालणार नाही.
पहिला धक्कादायक निकाल?
भारतात सुरू असलेल्या विश्वकरंडकात अद्याप एकही धक्कादायक निकाल लागलेला नाही. उद्या नवी दिल्लीत मोठा उलटफेर होऊ शकतो का, या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळेल. अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडला पराभूत केल्यास या स्पर्धेतील सर्वांत धक्कादायक निकाल असेल.
आजचा सामना
इंग्लंड - अफगाणिस्तान
स्थळ - नवी दिल्ली
वेळ - दुपारी २ वाजता
प्रक्षेपण - स्टार स्पोर्टस्, हॉट स्टार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.