विराट सेनेच्या पाहुणचारासाठी 'हिरवे हिरवे गार गालिचे...'

बीसीसीआयने ट्रेंटब्रिजच्या खेळपट्टीचा एक फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलाय.
ENG vs IND Trent Bridge Pitch
ENG vs IND Trent Bridge PitchBCCI Twitter

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला (ENG vs IND Test) आता अवघे दोन दिवस उरले आहेत. नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिजच्या मैदानातील (Trent Bridge pitch) पहिल्या कसोटी सामन्यातून 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघातील खेळाडू आणि संघाच्या रणनितीशिवाय क्रिकेटच्या सामन्यापूर्वी खेळपट्टी हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी बीसीसीआयने (BCCI) ट्रेंट ब्रिजच्या खेळपट्टीचा एक फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलाय.

इंग्लंडचा संघ ज्यावेळी भारतीय दौऱ्यावर आला होता त्यावेळी खेळपट्टीच्या मुद्यावरुन चांगलीच चर्चा रंगली होती. फिरकीसाठी अनुकूल ठरलेल्या खेळपट्टीवर भारतीय संघाने पाहुण्या इंग्लंडला नाचवले होते. आता इंग्लंडने आपल्या घरच्या मैदानात टीम इंडियाचा पाहुणाचार करण्यासाठी खेळपट्टीवर चांगलीच मेहनत घेतल्याचे दिसते. बीसीसीआयने शेअर केलेला फोटो पाहिला तर बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या कवितेतील हिरवे हिरवे गार गालिचे ...ही कविता तुम्हाला आठवेल. हरित तृणांच्या या मखमालीवरती खेळणे ही भारतीय संघासाठी कसोटीच असेल.

ENG vs IND Trent Bridge Pitch
Olympics : भारतीय महिला हॉकी संघ पहिल्यांदाच उपांत्य फेरीत

इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी सामन्यात भारतीय संघाला जलदगती गोलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्यांवरच खेळायला लागेल, हे अपेक्षित होते. पहिल्या सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीने हा अंदाज खरा ठरवलेला दिसतोय.बीसीसीआयने शेअर केलेल्या खेळपट्टीवर गवत दिसून येते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये अगदी अशीच खेळपट्टी पाहायला मिळाली होती.

ENG vs IND Trent Bridge Pitch
चक दे इंडिया! महिला हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक

2018 मध्ये भारतीय संघाने ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर अखेरचा कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात विराट कोहलीच्या 97 धावा आणि अंजिक्य रहाणेची 81 धावांची खेळी केली होती. या दोघांशिवाय हार्दिक पांड्या आणि जसप्रित बुमराह जोडीने प्रत्येकी 5-5 विकेट घेतल्या होत्या. बॅटिंग-बॉलिंगमधील या चौघडीच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडला 203 धावांनी पराभूत केले होते. यावेळी देखील भारतीय संघ अशीच कामगिरी करुन मालिकेची सुरुवात विजयाने करेल, अशी आशा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com