esakal | ENG vs PAK : पाकिस्तानी संघ नको तिथं टॉपर; जाणून घ्या रेकॉर्ड
sakal

बोलून बातमी शोधा

ENG vs PAK

ENG vs PAK : पाकिस्तानी संघ नको तिथं टॉपर; जाणून घ्या रेकॉर्ड

sakal_logo
By
सुशांत जाधव

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाचा फ्लॉप शो सुरुये. इंग्लंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातील पराभवासह बाबर आझमच्या नेतृत्वाखालील टीमने मालिका गमावलीये. मंगळवारी बेन स्टोक्स वर्सेस बाबरच्या नेतृत्वाखालील संघात तिसरा आणि अखेरचा वनडे सामना रंगणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर बाबर पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करत आहे. श्रीलंका विरुद्धच्या मालिकेत इंग्लंडच्या मुख्य संघातील 7 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे इंग्लंडचा नवखा संघ पाकिस्तान विरुद्ध मैदानात उतरलाय. या संघासमोरही पाकिस्तानी संघाने गुडघे टेकल्याचे पाहायला मिळाले.

दोन्ही वनडे सामन्यात पाकिस्तानच्या संघाला 200 आकडा गाठता आला नाही. दोन्ही मॅचमधील पराभवानंतर पाकिस्तानच्या नावे नकोसा विक्रम झालाय. पाकिस्तान संघ इंग्लंडच्या मैदानात सर्वाधिक वनडे सामने गमावणारा परदेशी संघ ठरलाय. इंग्लंडमध्ये खेळलेल्या 92 सामन्यातील 52 सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागलाय. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान 50-50 सामन्यातील पराभवासह संयुक्त स्थानी होते. पाकिस्तान संघाने इंग्लंडमध्ये 38 सामने जिंकले असून दोन सामने हे अनिर्णित राहिले आहेत.

हेही वाचा: ICC ट्रॉफी सोडा IPL ही जिंकली नाही; विराट नेतृत्वावर रैनाचे बोल

बाबर आझम पाकचा 17 वा कर्णधार

इंग्लंडमध्ये वनडे सामन्यात पाकिस्तान संघाचे नेतृत्व करणारा बाबर आझम सतरावा खेळाडू आहे. ज्या दोन मॅचमध्ये त्याने नेतृत्व केले त्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही सामन्यात बाबरलाही नावाला साजेसा खेळ करता आला नाही. पहिल्या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नव्हते. दुसऱ्या सामन्यात तो 19 धावा करुन माघारी फिरला होता. इंग्लंडमध्ये पाकिस्तानचा संघ इमरान खान आणि सरफराज अहमद यांच्या नेतृत्वाखाली अधिक सामने हरला आहे. दोघांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकी 8-8 सामन्यात पाकिस्तानी संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. इंग्लंडमध्ये पाकिस्तान संघाचे नेतृत्व करणाऱ्या 17 पैकी 5 कर्णधारांना एकही सामना जिंकता आलेला नाही.

हेही वाचा: EURO 2020 : 'गोल्डन बूट' लाडक्या रोनाल्डोचाच!

वनडेनंतर टी-20 मालिका

वनडे मालिकेनंतर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात 3 सामन्यांची टी-20 मालिकाही रंगणार आहे. 16 जुलै , 18 जुलै आणि 20 जुलै या तीन दिवसात हे सामने खेळवण्यात येतील. टी-20 सामन्यात पाकिस्तानी संघाचे रेकॉर्ड चांगले आहे. 17 पैकी त्यांनी 10 सामन्यात विजय मिळवला असून 6 पराभव तर एक सामना अनिर्णित राहिला आहे.

loading image