वोक्‍सने आयर्लंडला 38 धावांत गुंडाळले; इंग्लंडचा 143 धावांनी विजय 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 जुलै 2019

सातवी निच्चांकी धावसंख्या 
कसोटी क्रिकेटमध्ये 1932 नंतर आयर्लंडची 38 ही सातवी निच्चांकी धावसंख्या ठरली. त्यावेळी मेलबोर्न येथे ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा डाव 36 धावांत गुंडाळला होता. लॉर्डसवरील ही निचांकी धावसंख्या ठरली. या मैदानावर यापूर्वी 1974 मध्ये इंग्लंडने भारताचा डाव 42 धावांत गुंडाळला होता.

लंडन : पहिल्या डावात शंभरीही गाठण्यात अपयश आलेल्या इंग्लंडने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात तिसऱ्या दिवशी प्रतिस्पर्धी आयर्लंडला साधी पन्नाशीही गाठू दिली नाही आणि सामना 143 धावांनी जिंकला. 

आपला तिसराच कसोटी सामना खेळताना आयर्लंडने सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडला 85 धावांत गुंडाळून सनसनाटी निर्माण केली होती. त्यानंतर पहिल्या डावात 122 धावांची आघाडीही घेतली. मात्र, इंग्लंडच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात आयर्लंडला कसोटी क्रिकेटचे धडे देत बॅकफूटवर ढकलले. तिसऱ्या दिवशी पहिल्याच चेंडूवर इंग्लंडचा दुसरा डाव 303 या दुसऱ्या दिवस अखेरच्या धावसंख्येवरच संपुष्टात आला. विजयासाठी आयर्लंडसमोर संपूर्ण दोन दिवसात 182 धावांचे आव्हान होते. जोडीला पावसाची साथ होतीच. पावसाचा व्यत्यय येऊनही खेळ सुरू झाल्यावर इंग्लंडने पुन्हा खेळ थांबण्याची वाट पाहिली नाही. अवघ्या 15.4 षटकांत त्यांचा डाव 38 धावांतच गुंडाळत विजयावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडकडून ख्रिस वोक्‍सने 17 धावांत 6, तर स्टुअर्ट ब्रॉडने 19 धावांत 4 गडी बाद केले. 

विजयासाठी 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडची स्थिती एकवेळ 3 बाद 19 अशी होती. त्यानंतर आणखी 19 धावांत त्यांनी सात गडी गमावले. 

संक्षिप्त धावफलक : 
इंग्लंड 85 आणि 303 वि.वि. आयर्लंड 207 आणि 38 (ख्रिस वोक्‍स 7.4-2-17-6, स्टुअर्ट ब्रॉड 8-3-19-4) 

सातवी निच्चांकी धावसंख्या 
कसोटी क्रिकेटमध्ये 1932 नंतर आयर्लंडची 38 ही सातवी निच्चांकी धावसंख्या ठरली. त्यावेळी मेलबोर्न येथे ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा डाव 36 धावांत गुंडाळला होता. लॉर्डसवरील ही निचांकी धावसंख्या ठरली. या मैदानावर यापूर्वी 1974 मध्ये इंग्लंडने भारताचा डाव 42 धावांत गुंडाळला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: England beat Ireland in first test at Lords