World Cup 2019 : वोक्‍स, प्लंकेटचा प्रभावी मारा; इंग्लडला विजयासाठी 242 धावांचे आव्हान

वृत्तसंस्था
Sunday, 14 July 2019

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे पहिले वहिले विजेतेपद मिळविण्यापासून इंग्लंड आता 242 धावा दूर आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला 50 षटकांत 8 बाद 241 धावांत रोखण्यात इंग्लंडला यश आले.

वर्ल्ड कप 2019 : लंडन : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे पहिले वहिले विजेतेपद मिळविण्यापासून इंग्लंड आता 242 धावा दूर आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला 50 षटकांत 8 बाद 241 धावांत रोखण्यात इंग्लंडला यश आले. आता घरच्या मैदानावर प्रथमच आयसीसीच्या एकदिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्यासाठी इंग्लंडला गोलंदाजीस साथ मिळणाऱ्या खेळपट्टीवर सावध फलंदाजी करावी लागेल. 

ढगाळ हवामानात सुरू होणाऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने पुन्हा एकदा पाऊस आणि डकवर्थ लुईसच्या भूताचा संभाव्य धोका नजरेसमोर ठेवून नाणेफेक जिंकूनही प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्ण खरच धाडसी ठरला. इंग्लंडच्या अचूक गोलंदाजीसमोर त्यांना फलंदाजी करणे कठिण जात होते. सलामीचा फलंदाज हेन्‍री निकोल्सचे अर्धशतक आणि टॉम लॅथमच्या मधल्या फळीतील 47 धावा हेच त्यांच्यासाठी समाधान होते. 

न्यूझीलंडच्या डावाची सुरवात सावध होती. पहिल्या चेंडूपासून ख्रिस वोक्‍स आणि जोफ्रा आर्चर यांनी राखलेला टप्पा न्यूझीलंडच्या फलंदाजांना त्रस्त करत होता. त्यात पंच धर्मसेना आणि "डीआरएस' यांच्या कचाट्यात हेन्‍री निकोल्स आणि मार्टिन गुप्टिल अडकले होते. गुप्टिने आर्चरच्या एका षटकात थर्डमॅनला चढवलेला षटकार आणि नंतर "व्ही' क्षेत्रात मिळविलेला चौकार त्याचे मनसुबे स्पष्ट करणारा होता. पण, वोक्‍सने त्याचे मनसुबे तेवढ्यापुरतेच ठेवले. त्याने गुप्टिलला पायचित केले. त्यानंतर निकोल्स आणि कर्णधार विल्यमसन जोडी न्यूझीलंडसाठी तग धरून होती. मात्र, त्यांच्या खेळात वेग नव्हता. आत्मविश्‍वासाचा अभाव होता. 

इंग्लंडचे गोलंदाज टप्पा आणि दिशा सोडायला तयार नसताना निकोल्स आणि विल्यमसन यांनी नेटाने धावफलक हलता ठेवत 23व्या षटकांत न्यूझीलंडचे शतक फळकाव लावले. प्लंकेटने यष्टिरक्षक बटलरकरवी विल्यमसनची विकेट मिळविली. अर्थात, यासाठी त्यांना "डीआरएस'ची मदत घ्यावी लागली. न्यूझीलंडचे पहिले दोन्ही निर्णय तिसऱ्या पंचांनी दिले. यातील गुप्टिलची दाद फोल ठरली, इंग्लंडने "डीआरएस'ची संधी साधली. विल्यमसन गेल्यावर मात्र न्यूझीलंडच्या डावाने कधीच वेग घेतला नाही. 

त्यांच्या संपूर्ण डावात 14 चौकार आणि केवळ दोन षटकार ठोकले गेले. यावरून इंग्लंडच्या गोलंदाजीतील अचूकता समोर येते. न्यूझीलंडच्या डावाला वेसण बसलेली असतानाच मॉर्गनने विनाकारण सहाव्या गोलंदाजासाठी बेन स्टोक्‍सचा वापर केला. यामुळे न्यूझीलंडला थोडी मोकळीक मिळाली. निकोल्सही अर्धशतकी खेळी करून बाद झाला. लॅथमने 47 धावा केल्या. पण, त्यालाही वेग घेत आला नाही. त्यामुळेच त्यांचा डाव निर्धारित षटकांत 241 धावापर्यंतच मर्यादित राहिला. 
संक्षिप्त धावफलक 

न्यूझीलंड 50 षटकांत 8 बाद 241 (हेन्‍री निकोल्स 55 -77 चेंडू, 4 चौकार, टॉम लॅथम 47 -55 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, केन विल्यमसन 30, ख्रिस वोक्‍स 9-0-37-3, लियाम प्लंकेट 10-0-42-3, जोफ्रा आर्चर 10-042-1, मार्क्‍स वूड 10-1-49-1)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: England needs 2442 runs to win World Cup 2019 Final