esakal | ENG vs NZ Test Day 1 : पाहुण्यांसमोर यजमानांची बॅटिंग फेल
sakal

बोलून बातमी शोधा

ENG vs NZ

ENG vs NZ Test Day 1 : पाहुण्यांसमोर यजमानांची बॅटिंग फेल

sakal_logo
By
सुशांत जाधव

England vs New Zealand, 2nd Test : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिला दिवस न्यूझीलंडने गाजवला. दिवसाअखेर यजमान इंग्लंडने 7 विकेटच्या मोबदल्यात 258 धावा केल्या. ट्रेंट बोल्ड, मॅट हॅन्री अझाज पटेल यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या तर नील वॅगनरला एक विकेट मिळाली. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रॉरी बर्न्स आणि डॉमिनिक सिब्ले य़ा जोडीने इंग्लंडच्या डावाला सुरुवात केली. दोघांनी संयम खेळी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मॅट हॅन्रीने सिब्लेला 35 धावांवर बाद करत इंग्लंडची सलामी जोडी फोडली. सिब्लेने पहिल्या विकेटसाठी बर्न्ससोबत 72 धावांची भागीदारी रचली. (England vs New Zealand 2nd Test Day 1 Rory Burns Daniel Lawrence Trent Boult Matt Henry Ajaz Patel)

त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या झॅक क्राउलेला वॅगनरने खातेही उघडू दिले नाही. चार चेंडूचा सामना करुन तो केवळ हजेरी लावून तंबूत परतला. कर्णधार जो रुटही मैदानात तग धरु शकला नाही. मॅट हॅन्रीने त्याला अवघ्या 4 धावांवर माघारी धाडले. ओली पोप या मालिकेतील पहिला सामना खेळणाऱ्या अजाझ पटेलच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. विकेट किपर बॅट्समन जेम्स ब्रेसी पुन्हा एकदा फेल ठरला. त्याला बोल्टने खातेही उघडू दिले नाही. 52 चेंडूत 20 धावा करणाऱ्या ओली स्टोनच्या रुपात पटेलने सामन्यातील दुसरे यश मिळवले. पहिल्या दिवशी सलामीवीर रॉरी बर्न्सने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 187 चेंडूत 81 धावांची खेळी केली. बोल्टने त्याला लॅथमकरवी झेलबाद केले.

पहिल्या दिवसाअखेर डाव थांबला त्यावेळी डेनियल लॉरेन्स 100 चेंडूचा सामना करुन 67 धावांवर नाबाद खेळत होता. तर दुसऱ्या बाजूला मार्क वूड 58 चेंडूत 16 धावांवर खेळत होता. दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा संघ लवकरात लवकर तीन विकेट्स घेऊन पहिल्या डावाला सुरुवात करण्यास उत्सुक असतील. इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांसोबत लॉरेन्स संघाच्या धावसंख्येत किती धावा जोडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. या सामन्यावर पावसाचा प्रभाव राहिल्याचे पाहायला मिळाले होते. पहिल्या कसोटीतील तिसरा दिवस पावसाने बॅटिंग केली होती. परिणामी चार दिवसांच्या खेळात सामन्याचा निकाल लागू शकला नाही.