ENG vs WI : पाहुण्या विंडीज संघाचा इंग्लंडवर विजय

सुशांत जाधव
रविवार, 12 जुलै 2020

लंडन: कोरोनाजन्य संकटातून सावरत इंग्लंड-विंडीज कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर, साउथहॅम्प्टनच्या मैदानात यजमान इंग्लंड संघाला नमवत पाहुण्या विंडीज संघाने विजय मिळवला आहे. सामन्यातील पाचव्या दिवशीच्या खेळादरम्यान इंग्लंड संघाला  313 धावांवर रोखत, वेस्ट इंडिज संघाने 200 धावांचे लक्ष्य ब्लॅकवुडने केलेल्या 95 धावांच्या जोरावर पार केले. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाने 4 गडी राखत इंग्लंड वर विजय मिळवला आहे. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाच्या फलंदाजांसोबत गोलंदाजांनी देखील उत्तम कामगिरी केली.      

क्रीडा विषयक सविस्तर बातम्यांसाठी फॉलो करा @सकाळSports बेव आणि फेसबुक पेज 

दुसऱ्या डावात इंग्लंडच्या सलामी जोडीने संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती.  रोरी बर्न्स आणि डोमिनिक सिब्लेनं पहिल्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. बर्न्स 42 आणि सिब्ले 50 धावा करुन माघारी फिरल्यानंतर  जो डेन्ली 29 धावांवर बाद झाला. जॅक क्रॉली (76) आणि बेन स्टोक्स (46) यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी रचली. ही जोडी माघारी फिरल्यानंतर मोठ्या आशा असणारा बटलर अवघ्या 9 धावा करु तंबूत परतला. दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ 313 धावांवर आटोपला. त्यामुळे विंडीज संघाला विजयासाठी 200 धावांचे लक्ष्य मिळाले.विंडीजकडून दुसऱ्या डावात शॅनन गॅब्रिएल 5, रोस्टन चेज आणि अल्जारी जोसेफ यांनी प्रत्येकी 2 - 2 आणि जेसन होल्डरने 1 विकेट घेतल्या. 200 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या विंडीजसंघाचा सलामीवीर क्रॅग ब्रेथवेट(4) आणि ब्रुक्सला शून्यावर जोफ्रा आर्चरने परत पाठवले. तर शाई होपला मार्क वुडने 9 धावांवर पायचीत केले. 

यानंतर ब्लॅकवुडने (95) एक बाजू लढवत विंडीज संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. मात्र  बेन स्टोक्सने ब्लॅकवुडला जेम्स अँडरसन कडे झेलबाद केल्यामुळे त्याचे शतक थोडक्यात हुकले. तर रोस्टन चेस बाद झाल्यानंतर आलेल्या डाउरिचने 20 धावा करत ब्लॅकवुडला चांगली साथ दिली. मात्र डाउरिचला 20 धावांवर बटलरकडे झेलबाद करत बेन स्टोक्सने विकेट घेतली. डाउरिचनंतर आलेल्या जेसन होल्डर (14) आणि  जॉन कॅम्पबेल (8) यांनी वेस्ट इंडिजच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. वेस्ट इंडिज संघाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकत आघाडी मिळवली आहे.            

ENG vs WI : ऐतिहासिक सामन्यात विंडीजचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर 

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकल्यामुळे, ही विंडीजसाठी एक मोठी सुवर्णसंधी असेल. जवळपास 30 वर्षांपासून विंडीजने इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकलेली नाही. तीन कसोटी सामन्यातील पहिला सामना जिंकून वेस्ट इंडिज संघाने दमदार वाटचाल केली आहे. 

इंग्लंड: पहिला डाव 204/10, दुसरा डावा  313/10
वेस्टइंडीज: 318/10 दुसरा डावा 200/6


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: england vs west indies 1st test day 5 Match west indies team Golden opportunity and chance to set new Record