Ashes 2019 : इंग्लंडच्या विजयाने 'ऍशेस' बरोबरीत; आर्चर ठरला 'मॅन ऑफ द मॅच'!

वृत्तसंस्था
रविवार, 15 सप्टेंबर 2019

मॅथ्यू वेडचे (117) शतक त्यांच्या डावात वैशिष्ट्यपूर्ण ठरले. पण, त्याला पराभव वाचवता आला नाही. स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच यांनी प्रत्येकी चार गडी बाद करून ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. 

ऍशेस : लंडन : घरच्या मैदानावर इंग्लंडला ऍशेस करंडक आपल्याकडे राखण्यात अपयश आले असले, तरी त्यांनी चौथ्या सामन्यातील पराभवानंतर चालू 'ऍशेस' मालिका बरोबरीत सोडविण्याचे बोल खरे केले. अखेरच्या पाचव्या कसोटी सामन्यात त्यांनी रविवारी चौथ्या दिवशीच ऑस्ट्रेलियाचा 135 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव गुंडाळताना सहा गडी बाद करणारा इंग्लंडचा जोफ्रा आर्चर सामन्याचा मानकरी ठरला. इंग्लंडच्या विजयाने मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. 

- INDvSA : टी-20 संघातील खेळाडूंना विराटचे आवाहन

विजयासाठी इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर 399 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 77 षटकांत 263 धावांत संपुष्टात आला. मॅथ्यू वेडचे (117) शतक त्यांच्या डावात वैशिष्ट्यपूर्ण ठरले. पण, त्याला पराभव वाचवता आला नाही. स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच यांनी प्रत्येकी चार गडी बाद करून ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. 

त्यापूर्वी, चौथ्या दिवशी सकाळी इंग्लंडचा डाव 8 बाद 313 या तिसऱ्या धावसंख्येवरून फार लांबला नाही. आणखी 16 धावांची भर घालून त्यांचा दुसरा डाव 329 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनने चार गडी बाद केले. दुसऱ्या डावातील भक्कम फलंदाजीने इंग्लंडला ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 399 धावांचे आव्हान ठेवता आले. 

- INDvSA : धरमशालात कोसळधार; पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द

इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी पुन्हा अपयशी ठरली. ब्रॉडच्या दणक्‍याने हॅरिस (9) आणि डेव्हिड वॉर्नर (11) झटपट बाद झाले. ब्रॉडने वॉर्नरला सातव्यांदा बाद केले. त्यानंतर फिरकी गोलंदाज लीचने लाबुशेन-स्मिथ ही जोडी टिकू दिली नाही. त्याने लाबुशेनला बाद केले. त्यानंतर ब्रॉडने स्मिथ नावाचे ऑस्ट्रेलियाचे अस्त्र मालिकेत प्रथमच निकामी केले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाची स्थिती 4 बाद 85 अशी होती.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाला मॅथ्यू वेडने झळकाविलेल्या शतकामुळे 263 धावांची मजल मारता आली. त्याला मार्श (24) आणि टिम पेन (21) मोठी साथ देऊ शकले नाहीत. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाचा पराभव पाचव्या दिवसापर्यंत लांबू शकला नाही. खेळपट्टीचे बदलते स्वरुप लक्षात घेत कर्णधार रूटने स्वतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने मार्शची विकेट मिळविली. त्यानंतर लीचने ऑस्ट्रेलियाचे तळाचे फलंदाज स्थिरावू दिले नाहीत.

या दरम्यान रुटने कारकिर्दीत चौथे शतक झळकाविणाऱ्या वेडची झुंज मोडून काढली. लीचने 77व्या षटकांतील अखेरच्या दोन चेंडूंवर लायन आणि हेझलवूड यांना बाद करून इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

संक्षिप्त धावफलक :
इंग्लंड 294 आणि 329 वि.वि. ऑस्ट्रेलिया 225 आणि 263 (मॅथ्यू वेड 117 -168 चेंडू, 17 चौकार, 1 षटकार, मार्श 23, स्मिथ 23, पेन 21, ब्रॉड 15-1-62-4, लीच 22-8-49-4, रुट 9-1-26-2)

- Pro Kabaddi 2019 : प्रदीप, नीरजचा 'पायरेट्स' मारा 'पलटण'वर पडला भारी!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: England win fifth Test by 135 runs as series is drawn