World Cup 2019 : रॉयची फटाका खेळी; इंग्लंडची अंतिम फेरीत धडक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

ख्रिस वोकस्, जोफ्रा आर्चर आणि आदील रशिदने मिळून 9 फलंदाजांना तंबूत रस्ता दाखवला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन डाव 49व्या षटकात 223 धावांवर संपवला तिथेच यजमान संघाचा प्रवास लॉर्डस् मैदानाच्या दिशेने चालू झाला. विजयाकरता 224 धावांचे आव्हान जेसन रॉयच्या 85 धावांच्या तोडफोड खेळीने सहजी पेलता आले.

वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : ख्रिस वोकस्, जोफ्रा आर्चर आणि आदील रशिदने मिळून 9 फलंदाजांना तंबूत रस्ता दाखवला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन डाव 49व्या षटकात 223 धावांवर संपवला तिथेच यजमान संघाचा प्रवास लॉर्डस् मैदानाच्या दिशेने चालू झाला. विजयाकरता 224 धावांचे आव्हान जेसन रॉयच्या 85 धावांच्या तोडफोड खेळीने सहजी पेलता आले. इंग्लंडने 33व्या षटकात फक्त दोनच फलंदाज गमावून विजयाला गवसणी घालून अंतिम सामन्यात रुबाबात प्रवेश केला. इंग्लंड आणि न्युझिलंड संघांदरम्यान 14 तारखेला अंतिम सामना रंगणार असल्याने विश्वचषकाला नवा धनी मिळणार हे आता नक्की झाले आहे. 

नाणेफेकीच्या बाबतीत अ‍ॅरॉन फिंच नशीबवान ठरला आणि त्याने अर्थातच प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जोफ्रा आर्चरने कप्तान फिंचला त्याने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर पायचित केले. दोन चौकार मारून शक्ती प्रदर्शन करणार्‍या डेव्हिड वॉर्नरला ख्रिस वोकस्ने बाद केले आणि लगेच हँडस्कोंबला बोल्ड केले. भारताची जशी झाली तीच अवस्था फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची झाली. तीन फलंदाज बाद झाल्याने दडपणाचे ओझे वाढले. अशी परिस्थिती मोठ्या फलंदाजांना साद घालते, सर्वोत्तम खेळ सादर करायला पेटवते. स्टीव्ह स्मिथने तेच करून दाखवले. स्मिथला गुणवान अलेक्स केरीने मस्त साथ दिली. दोघांनी गडगडणारा डाव थोडा सावरला. केरीने संपूर्ण स्पर्धेत फलंदाजी करताना दाखवलेली चमक भावणारी होती. 

शतकी भागीदारी झाल्यावर केरी 46 धावांवर रशीदला षटकार मारायच्या प्रयत्नात बाद झाला तो कलाटणी देणारा क्षण ठरला. रशीदने नंतर स्टॉयनीस आणि कमिन्सला बाद केले. नेहमी काही तरी कमाल करून दाखवेल अशी वेडी आशा वाटणारा मॅक्सवेलला जोफ्रा आर्चरने कमाल कमी वेगाचा चेंडू टाकून फसवून झेलबाद केले. स्मिथने एकट्याने संयमाने फलंदाजी करून ऑस्ट्रेलियाला बरा धावफलक उभारायला मदत केली. स्मिथ धावचीत झाल्यावर मोठ्या धावसंख्येच्या आशा मावळल्या. वोकस्, रशीदने प्रत्येकी 3 आणि जोफ्रा आर्चरने 2 फलंदाजांना बाद करून 49 षटकातच ऑस्ट्रेलियाचा डाव 223 धावांवर संपवला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी आपली भूमिका चोख पार पाडली होती.

विजयाकरता आणि अंतिम सामन्यात धडक मारायला 224 धावांचा पाठलाग करायचा होता. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोने मिचेल स्टार्कच्या पहिल्या टप्प्यात विकेट गमावून दिली नाही तिथेच अर्धी लढाई इंग्लंडने जिंकली. हळू हळू जम बसल्यावर रॉयने मोठे फटके मारले. फिरकी गोलंदाज लायनचे स्वागत जेसन रॉयने एक चौकार एक षटकार मारून केले. भागीदारीचे अर्धशतक सहजी फलकावर लागले. नंतर रॉयच्या बॅटीत वारे संचारले. त्याने स्मिथला एकाच षटकात सलग तीन षटकार ठोकले. 124 धावांची दणकट भागीदारी झाल्यावर बेअरस्टोला स्टार्कने पायचित केले. 

9 चौकार आणि 5 षटकारांसह 85 धावांवर खेळत शतकाकडे सुसाट पळत सुटलेल्या जेसन रॉयला पंच धर्मसेना यांनी ‘राखी बांधली’. चेंडूने बॅट किंवा ग्लोव्हज्ची कड घेतली नसताना धर्मसेना यांनी रॉयला बाद ठरवले. बेअरस्टोने तिसर्‍या पंचांकडे दाद मागून रिव्ह्यू वाया घालवल्याने रॉयला भन्नाट शतकापासून वंचित राहावे लागले.

विजयाकरता गरजेच्या धावा काढायची जबाबदारी कप्तान मॉर्गन आणि ज्यो रुटने समर्थपणे पेलली. 33व्या षटकात इंग्लंडने विजयी धावा काढल्या तेव्हा रूट 49 आणि मॉर्गन 45धावांवर नाबाद राहिले. ज्या एजबास्टन मैदानावर इंग्लंडच्या विश्वचषक मोहिमेला नवसंजीवनी मिळाली त्याच मैदानावर एकदम बहारदार कामगिरी करून इंग्लंडने अंतिम सामन्यात प्रवेश केला आणि चाहत्यांची बार्मी आर्मी गाणी गायला लागली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: England wins against Australia in semi final in World Cup 2019