World Cup 2019 : इंग्लंडची उपांत्य फेरीत धडक; न्यूझीलंडचा प्रवेश जवळपास निश्चित

वृत्तसंस्था
Thursday, 4 July 2019

न्यूझीलंडने हा सामना 120 धावांनी गमावला असला तरी त्यांचाही उपांत्य प्रवेश जवळपास निश्‍चित झाला आहे. तर पाकिस्तानचेही आव्हान संपल्यातच जमा झाले आहे. 

वर्ल्ड कप 2019 : चेस्टर ली स्ट्रीट : काही सामन्यांपूर्वी हेलखावे खाणाऱ्या इंग्लंडने अगोदर भारताला आणि आज (बुधवार) न्यूझीलंडचा पराभव करून विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी थाटात गाठली. न्यूझीलंडने हा सामना 120 धावांनी गमावला असला तरी त्यांचाही उपांत्य प्रवेश जवळपास निश्‍चित झाला आहे. तर पाकिस्तानचेही आव्हान संपल्यातच जमा झाले आहे. 

जॉनी बेरअरस्टॉचे शानदार शतक आणि त्याने जेसन रॉयसह केलेल्या शतकी सलामीनंतरही 305 धावाच करू शकलेल्या इंग्लंडने न्यूझीलंडला 186 धावांत गुंडाळले आणि आणखी एक सामना थाटात जिंकला. कर्णधार केन विलियमसन आणि रॉस टेलर हे भरवशाचे फलंदाज धावचीत झाल्यावर न्यूझीलंडच्या आव्हानातील हवा इंग्लंडच्या गोलंदाजांनी काढून टाकली. 
मार्टिन गुप्तिल आणि निकोलस हे सलामीवर लवकर बाद झाल्यावर विलियमसन आणि टेलर धावचीत झाले त्यानंतर न्यूझीलंडने सरासरीला धोका पोहचू नये म्हणून पराभवाचे अंतर कमी करण्यावर भर दिला. तरिही त्यांचा डाव 45 षटकेच चालला. 

तत्पर्वी, बेअरस्टॉ आणि जेसन रॉय यांनी भारताविरुद्धच्या सामन्याचा दुसरा अंकच जणू सादर करताना न्यूझीलंड गोलंदाजांवर हल्ला चढवला. न्यूझीलंडने आज आक्रमणात बदल करताना सॅंतनर या फिरकी गोलंदाजाकडून सुरुवात केली; परंतु त्याच्या पहिल्याच षटकात नऊ धावा फटकावून बेअरस्टॉ आणि रॉय यांनी आपला पवित्रा दाखवून दिला होता. 
न्यूझीलंडने आज अनुभवी साऊदीला संधी दिली, पण इंग्लंडच्या सलामीवीरांवर कोणाचा प्रभाव पडला नाही. फॉर्मात असलेल्या बोल्टवरही ते तुटून पडले होते. 88 चेंडूतच शतकी सलामी देणाऱ्या रॉय आणि बेअरस्टॉ यांना रोखणे कठीण वाटत होते त्यावेळी न्यूझीलंड सहज साडेतीनशे धावांचा टप्पा गाठणार असे चित्र होते. 

नीशाम गोलंदाजीला आला आणि थोडे चित्र बदलले. रॉयला बाद करून त्याने ही जोडी फोडली. त्यानंतर बोल्टने ज्यो रूट आणि बढती देण्यात आलेल्या जॉस बटलर यांना बाद केले. तेथूनच न्यूझीलंडने हळूहळू परिस्थिती बदलण्यास सुरुवात केली. भारताविरुद्ध तडाखेबंद खेळी करणारा बेन स्टोक्‍स एकदा धावचित होता होता वाचला; परंतु त्याची आजची खेळी 11 धावांची राहिली. त्यासाठी त्याने 27 चेंडू खर्ची घातले. 

कर्णधार इयॉन मॉर्गन एक बाजू सांभाळत होता. त्यामुळे इंग्लंडने तीनशे धावांचा विचार सुरू केला. 40 व्या षटकात त्यांनी 4 बाद 241 धावा केल्या; पण अखेरच्या 10 षटकांत विकेट तर गमावल्या, त्याचबरोबर त्यांच्या धावांच्या गतीला ब्रेक लागला. अखेरची तीन षटके शिल्लक होती, तरी त्यांच्या खात्यात 277 धावाच होत्या. त्यातच मॉर्गनही बाद झाला होता; परंतु प्लंकेट आणि आदिल रशीद यांनी योगदान दिल्यामुळे तीनेश धावांना भोज्जा करता आला. 

संक्षिप्त धावफलक : 

इंग्लंड : 50 षटकांत 8 बाद 305 (जेसन रॉय 60-61 चेंडू, 8 चौकार, जॉनी बेअरस्टॉ 106-99 चेंडू, 15 चौकार, 1 षटकार, इयॉन मॉर्गन 42-40 चेंडू, 5 चौकार, प्लंकेट नाबाद 15, रशीद 16, ट्रेंट बोल्ट 10-0-56-2, हेन्री 10-0-54-2, नीशाम 10-1-41-2) वि. वि. न्यूझीलंड : 45 षटकांत सर्वबाद 186 (केन विलियमसन 27, रॉस टेलर 28, लॅथम 57, मार्क वूड 9-0-34-3, जोफ्रा आर्चर 7-1-17-1)

पाकसाठी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अले असेल गणित 
- प्रथम फलंदाजी केल्यास 400 धावा आणि बांगलादेशला 84 धावांच गुंडाळावे लागेल (316 धावांनी) 
- 350 धावा केल्या तर बांगलादेशला 38 धावांत बाद करावे लागेल. (312 धावांनी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: England wins against New Zealand and qualifies for semi final in world cup 2019