Euro Cup
Euro Cupsakal

Euro Cup : यजमान जर्मनीची दणदणीत सलामी;स्कॉटलंडवर ५-१ असा मोठा विजय

यजमान जर्मनीने युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत दणदणीत विजयी सलामी दिली. १० खेळाडूंसह खेळणाऱ्या स्कॉटलंडचा त्यांनी ५-१ असा धुव्वा उडवला. फुटबॉल विश्वात वर्चस्व असलेल्या जर्मनीने तीनदा युरो करंडक जिंकलेला आहे; परंतु गेल्या दशकांत त्यांना एकाही मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आलेले नाही.
Published on

म्युनिक : यजमान जर्मनीने युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत दणदणीत विजयी सलामी दिली. १० खेळाडूंसह खेळणाऱ्या स्कॉटलंडचा त्यांनी ५-१ असा धुव्वा उडवला. फुटबॉल विश्वात वर्चस्व असलेल्या जर्मनीने तीनदा युरो करंडक जिंकलेला आहे; परंतु गेल्या दशकांत त्यांना एकाही मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आलेले नाही. यंदाच्या या युरो स्पर्धेत मात्र त्यांनी संभाव्य विजेत्यांच्या थाटात सुरुवात केली. जर्मनीकडून फ्लोरिअन विर्ट्झ, जमाल मुसियाला आणि काई हॅव्हर्ट्झने पेनल्टीवर गोल केले, त्यानंतर निक्लस फुएलक्रग आणि एमरे कॅन यांनी उत्तरार्धात दोन गोल झळकावले.

मध्यांतरला काही वेळ शिल्लक असताना स्कॉटलंडचा डिफेंडर रायन पोर्टियस याला रेड कार्ड दाखवून बाहेर काढण्यात आले. जर्मनीच्या अँथोनियो रुडिगरने स्वयंगोल केल्यामुळे स्कॉटलंडच्या नावावर एकमेव गोलाची नोंद झाली. जर्मनीचा पुढचा सामना बुधवारी हंगेरीविरुद्ध होणार आहे.

आम्ही प्रबळ इच्छाशक्तीने खेळ केला. काही धोके पत्करले, त्यामुळे आम्हाला एवढे गोल करता आले. पहिल्या अर्धात ३-० आघाडी मिळवताना केलेला खेळ अफलातून होता, असे मत जर्मनीचा कर्णधार इल्के गुंडोगन याने व्यक्त केले. अशीच सुरुवात आम्हाला हवी होती. सामन्याअगोदर आम्ही अतिशय सकारात्मक होतो आणि त्याचे प्रत्यंत्तर सामन्यात दिसून आले, असेही त्याने सांगितले.

२०१८ मधील युरो स्पर्धा आणि २०२२ मधील विश्वकरंडक स्पर्धेत सलामीला जर्मनीला पराभवाचे धक्के सहन करावे लागले होते. २०२१ मधील युरो करंडक स्पर्धेतही त्यांना सलामीला अपयशाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे मायदेशात होत असलेल्या या स्पर्धेत त्यांना विजय आवश्यक होता. परिणामी, स्कॉटलंडविरुद्ध सुरुवातीपासून वर्चस्व मिळवले होते.

टॉनी क्रुसने ३० मीटर यार्डावरून जोशुआ किमिच याच्याकडे अचूक पास दिला आणि त्याने योग्य वेळी चेंडू फ्लोरिअन विर्ट्झ याच्याकडे दिला, त्याने क्षणाचाही विलंब न करता १०व्या मिनिटाला जर्मनीचा पहिला गोल केला. २१ वर्षीय फ्लोरिअन विर्ट्झ युरो स्पर्धेत जर्मनीकडून गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. आठ मिनिटांनंतर जमाल मुसियाला याने गोल केला तर पूर्वार्ध संपता संपता मिळालेल्या पेनल्टीवर काई हॅव्हर्ट्झने गोल टोलावला.

पूर्वार्धात आमच्याकडून चूका झाल्या. आम्ही क्षमतेनुसार खेळ करू शकलो नाही. आक्रमणातही धार कमी होती. चेंडूंचाही ताबा व्यवस्थित मिळत नव्हता, असे मत स्कॉटलंडचा कर्णधार अँडी रॉब्रेटसन याने व्यक्त केले. जर्मनीच्या गोलजाळ्याच्या दिशेने चेंडू मारण्याची संधी स्कॉटलंडला एकदाही मिळाली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.