fifa world cup 2022 : पाच मिनिटांतील चुकांनी घात केला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lionel-Messi

fifa world cup 2022 : पाच मिनिटांतील चुकांनी घात केला!

कतार : या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अशा प्रकारे आमची सुरुवात होईल असा स्वप्नातही विचार केला नव्हता. पाच मिनिटांच्या खराब खेळाने आमचा घात केला, अशी निराशा अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने व्यक्त केली.

अनुभवात आणि फिफा रँकिंगमध्येही अर्जेंटिनापेक्षा किती तरी पटीने मागे असलेल्या सौदी अरेबियाने २-१ असा धक्कादायक विजय मिळवून विश्वकरंडक स्पर्धेत सनसनाटी निर्माण केली. या पराभवामुळे अर्जेंटिनाचे स्पर्धेतील आव्हान संकटात सापडले आहे.

अशा प्रकारचा धक्कादायक पराभव या अगोदर फार वर्षांपूर्वी झाला होता. आणि आता संघात असलेल्या एकाही खेळाडूने अशी धक्कादायक हार कधीही अनुभवली नव्हती, म्हणूनच या धक्क्यातून सावरणे सोपे नाही, अशी भावना मेस्सीने सामन्यानंतर व्यक्त केली.

९० मिनिटांच्या खेळात केवळ पाच मिनिटांत केलेल्या चुकांमुळे आम्ही १-२ असे पिछाडीवर पडलो, त्यानंतर संघटित खेळावरचे आमचे नियंत्रण कमी झाले. एका पराभवाने सर्व काही संपलेले नाही, आम्हाला पुढच्या सामन्यांत जोरदार खेळ करावा लागणार आहे, पाठीराख्यांनीही आमच्यावरचा विश्वास कमी होऊ देऊ नये, असे मेस्सी म्हणाला.

सौदी अरेबिया हा संघ असा आहे की त्यांना एक संधी दिली की त्यांना रोखणे सोपे नसते. त्यांनी आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला नाही. ते कसा खेळ करू शकतात याची आम्हाला जाणीव होती. आता पुढचे दोन्ही सामने आम्हाला जिंकायचेच आहेत, असे सांगून मेस्सी म्हणाला, ‘‘ज्या चुका केल्या त्यावर उत्तर शोधावे लागेल. नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. निकालाने आम्हालाही वेदना झाल्या आहेत. आता लौकिकाप्रमाणे खेळ करावा लागेल, अधिक एकसंध व्हावे लागेल. आम्ही किती कणखर आहोत हे दाखवून द्यावे लागेल.’’

या सामन्यात १० व्याच मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी किकवर मेस्सीने गोल करून अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली होती; परंतु हे वर्चस्व त्यांच्या बचावफळीने पाण्यात घातले. मेस्सीची पेनल्टी किक सौदीचा गोलरक्षक महम्मद अल ओवासिसला अडवता आली नव्हती, त्यानेच नंतर अभेद्य गोलरक्षण करून अर्जेंटिनाला विजयापासून दूर ठेवले. त्यातच ऑफसाईडमुळे अर्जेंटिनाचे तीन गोल अवैध ठरले.

या संपूर्ण सामन्यात चेंडूवर अर्जेंटिना संघाचा ६९ टक्के ताबा होता. आक्रमणे त्यांच्याकडूनच होत होती; परंतु पाच मिनिटांत संधी मिळताच सौदीच्या खेळाडूंनी केलेला खेळ सामन्याचे चित्र पालटणारा ठरला.