Fifa World Cup 2022: कॅमेऱ्यांच्या तिसऱ्या डोळ्याचे वर्ल्डकप सामन्यामध्ये महत्व वाढलं

जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब होत असता
Fifa World Cup 2022
Fifa World Cup 2022sakal

जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब होत असतानाच आता कतारमध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत तंत्रज्ञानाची क्रांती पाहायला मिळणार आहे. रशिया येथे २०१८मध्ये झालेल्या विश्‍वकरंडकादरम्यान ‘वार’ (व्हीएआर) या नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला होता. ‘फिफा’ने कतार विश्वकरंडक स्पर्धेसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. फुटबॉलच्या रणांगणातील बारीकसारीक बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी ‘फिफा’कडून ‘सेमी ऑटोमेटेड’ तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर तब्बल १२ कॅमेऱ्यांची करडी नजर या वेळी प्रत्येक हालचालीवर असणार आहे. दिएगो मॅराडोना यांनी १९८६मधील विश्‍वकरंडकात केलेला ‘हँड ऑफ गॉड’ गोल पंचांच्या नजरेतून सुटला होता. पण आता नव्या तंत्रज्ञानामुळे अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत.

सेमी ऑटोमेटेड तंत्रज्ञानात कॅमेऱ्यांचे फुटबॉलच्या हालचालींवर लक्ष असणार आहे. तो फुटबॉल खेळाडूंपासून किती दूरवर आहे हेही त्यामधून समजणार आहे. यामुळे फुटबॉलपटू ऑफसाईड झालेला क्षण क्षणार्धात ओळखता येणार आहे. व्हिडिओ सामनाधिकारी मैदानातील सर्व बाबींवर बारकाईने लक्ष देतील. त्यामुळे मैदानातील पंच ऑफसाइड देण्याआधी व्हिडिओ सामनाधिकारी याबाबतचा निर्णय देऊ शकणार आहेत. ‘फिफा’कडून या नव्या तंत्रज्ञानाची चाचपणीही करण्यात आली आहे. २०२१मधील अरब करंडक व क्लब जागतिक करंडक या दोन स्पर्धांमधून या तंत्रज्ञानाची तपासणी करण्यात आली आहे.

आशियाई खंडात दुसऱ्यांदाच थरार

विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेवर युरोप व दक्षिण अमेरिका खंडातील देशांचे नेहमीच वर्चस्व असते. आशियाई खंडामध्ये आयोजन होत असलेला हा दुसराच फुटबॉल विश्‍वकरंडक आहे. याआधी २००२ मध्ये दक्षिण कोरिया व जपान या देशांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आता तब्बल २० वर्षांनंतर आशियाई खंडात फुटबॉलची किक बसणार आहे.

दक्षिण अमेरिकन संघांना फायदा

पश्‍चिम आशियाई देशांमध्ये कतारचा समावेश होतो. अरबी भाषा अधिक प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या या देशामध्ये संयुक्त अरब अमिराती, इराक, कुवेत, बहरीन यांसारख्या देशांप्रमाणेच वाळूचे साम्राज्य दिसून येते. समुद्र व वाळू हे मिश्रण आगामी विश्‍वकरंडकात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण असे की, कतारमधील वातावरण व दक्षिण अमेरिका खंडातील देशांचे वातावरण एकसारखेच असते. त्यामुळे विश्‍वकरंडक सुरु होण्याआधीच दक्षिण अमेरिका खंडातील देशांना मानसिक फायदा होण्याची शक्यता आहे. ब्राझील, अर्जेंटिना, इक्वेडोर व उरुग्वे या चार देशांचा त्या खंडात समावेश आहे. यामधील ब्राझील, अर्जेंटिना व उरुग्वे या देशांनी याआधी मानाची ही स्पर्धा जिंकली आहे. ब्राझीलमध्ये तर लहानपणापासूनच मुले सागरी चौपाट्यांवर फुटबॉल खेळतात.

त्यामुळे कतारमधील वातावरणाशी त्यांना जुळवून घ्यायला हरकत नाही. दर चार वर्षांनंतर होणारा विश्वकरंडक हा मे ते जून या दरम्यान होत असतो. मात्र यंदाची स्पर्धा आशियाई देशात आहे. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन नोव्हेंबर ते डिसेंबर या दरम्यान करण्यात आले. युरोप व दक्षिण अमेरिका देशांतील खेळाडूंसाठी योग्य वातावरण स्पर्धेदरम्यान असणार आहे. उष्णता किंवा आर्द्रतेची समस्या जाणविल्यास सध्या जगभरात नव्या तंत्रज्ञानाची निर्मिती झाली आहे. त्यानुसार स्टेडियममध्ये वातानुलित यंत्रणा ‘फिफा’, संयोजकांनी केली आहे.

लढतींच्या वेळा योग्य

कतार विश्‍वकरंडकातील लढतींच्या वेळा या भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३०, संध्याकाळी ६.३०, रात्री ८.३०, ९.३० आणि मध्यरात्री १२.३० अशा असणार आहेत. दुपारच्या लढतींचा त्रास होईल असे वाटत नाही. कारण नोव्हेंबर - डिसेंबर या महिन्यांतील कतारचे वातावरण त्यातल्या त्यात थंड असते. तसेच कतारमध्ये काही लढती रात्री उशीरा सुरु होणार आहेत. युरोप खंडातील देशांसाठी हा पर्याय संयोजकांनी शोधला असावा. कारण याच वेळेदरम्यान त्यांच्याकडे लढती होत असतात. मात्र जगभरातील फुटबॉलपटू व्यावसायिक आहेत. त्यामुळे कोणत्याही वातावरणात व वेळांमध्ये खेळण्याची त्यांना सवय असते. कतारमधील लढतींच्या वेळांचा कोणताही तोटा होणार नाही.

व्यवस्थापकांचा कस

फुटबॉलचा विश्‍वकरंडक हा जगभरातील लीग संपल्यावर होत असतो. पण यंदाची स्पर्धा ही नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात होणार आहे. काही लीग अर्धवट राहिल्या आहेत. त्या लीगमधील सामने विश्‍वकरंडक आटोपल्यानंतर होतील. यावेळी प्रत्येक देशाच्या संघ व्यवस्थापकाचा कस लागणार आहे. स्पर्धेपूर्वी काही बाबी अत्यंत महत्त्वाच्या असतात. पूर्वतयारी, तंदुरुस्ती, सराव, एकमेकांसोबतचा समन्वय या बाबी जुळून यायला हव्यात. संघ व्यवस्थापकावर ही जबाबदारी असणार आहे. इतर स्पर्धांमधून एकत्र येणारे खेळाडू कमी अवधीत एकमेकांशी कशाप्रकारे समन्वय साधतात, यावर स्पर्धेतील त्यांचे यश-अपयश अवलंबून असणार आहे.

यंदाची स्पर्धा आव्हानात्मक

यंदाची विश्‍वकरंडक स्पर्धा आव्हानात्मक असणार आहे. इतर स्पर्धांपेक्षा वेगळी असणार आहे. कारण या स्पर्धेमध्ये पहिल्या स्थानावरील देशापासून ६१व्या स्थानावरील देशांपर्यंतचा समावेश आहे. त्यामुळे साखळी फेरीपासूनच या स्पर्धेतील लढतींमध्ये थरार अनुभवता येणार आहे. बाद फेरी गाठण्यासाठी चुरस दिसून येईल. ब्राझील, अर्जेंटिना, इंग्लंड हे दादा संघ आहेत. पण क्रोएशिया, पोलंड, कॅनडा, इराण या देशांना कमी लेखून चालणार नाही. हे देश ‘अंडरडॉग्ज’ आहेत. त्यांच्याकडून ‘चमत्कारा’ची आशा बाळगता येईल. फ्रान्स हा संघ गतविजेता आहे. पण फुटबॉल विश्‍वकरंडकाच्या इतिहासावर नजर टाकता ब्राझील वगळता एकाही देशाला जेतेपद राखता आले नाही. त्यामुळे फ्रान्स यंदा बाजी मारेल असे वाटत नाही.

(शब्दांकन ः जयेंद्र लोंढे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com