FIFA World Cup : लक्ष्य सलग दुसऱ्या विजयाचे नेदरलँडस्‌-एक्वेडोरमध्ये आज लढत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FIFA World Cup

FIFA World Cup : लक्ष्य सलग दुसऱ्या विजयाचे नेदरलँडस्‌-एक्वेडोरमध्ये आज लढत

अल रयान (कतार) : रशियामधील मागील विश्‍वकरंडकात पात्र न ठरलेल्या नेदरलँडस्‌ संघाने यंदाच्या विश्‍वकरंडकात सलामीच्याच लढतीत सेनेगलवर २-० असा विजय साकारला आणि आपल्या अभियानाची दमदार सुरुवात केली. मात्र आता ‘अ’ गटातील उद्या होत असलेल्या लढतीत त्यांच्यासमोर एक्वेडोरचे आव्हान असणार आहे. एक्वेडोर संघानेही सलामीच्या लढतीत यजमान कतारला २-० असे हरवले. त्यामुळे आता नेदरलँडस्‌ व एक्वेडोर हे दोन्ही संघ सलग दुसऱ्या विजयासाठी प्रयत्न करताना दिसतील.

नेदरलँडस्‌ने पहिल्या लढतीत सेनेगलवर विजय मिळवला, पण हा विजय मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. कॉडी गॅकपो व डेव्ही क्लासेन यांनी गोल करीत या विजयात मोलाचा वाटा उचलला. मुख्य प्रशिक्षक लुईस वॅन गाल यांनी पहिल्या लढतीत ३-५-२ अशा कॉम्बिनेशनने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. विजयामुळे हा निर्णय सार्थ ठरला.

आव्हान कायम राखण्यासाठी सज्ज

‘अ’ गटामध्ये उद्या कतार व सेनेगल यांच्यामध्ये अन्य लढत होणार आहे. कतार व सेनेगल या दोन्ही संघांना पहिल्या लढतीत हार सहन करावी लागली आहे. त्यामुळे आता उद्याच्या लढतीत दोन्ही संघ विजय मिळवून या स्पर्धेतील आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहेत.

दृष्टिक्षेपात

नेदरलँडस्‌ला विश्‍वकरंडकात आतापर्यंत तीन वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.

नेदरलँडस्‌ संघाला १९७४, १९७८ व २०१० मध्ये उपविजेतेपद मिळाले.

नेदरलँडस्‌ संघाने १९९८ मध्ये चौथे, तर २०१४ मध्ये तिसरे स्थान पटकावले होते.

नेदरलँडस्‌ संघ २०१८ मधील विश्‍वकरंडकात पात्र ठरला नव्हता.