रोनाल्डोची युनायटेडला सोडचिठ्ठी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cristiano Ronaldo

रोनाल्डोची युनायटेडला सोडचिठ्ठी?

लंडन : फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आता दुसऱ्या क्लबकडून खेळण्याचा विचार करत आहे. त्यामुळे या मोसमापूर्वी तो युनाटेडला सोडचिठ्ठी देऊ शकतो. माध्यम अहवालानुसार, रोनाल्डोने युनायटेडसमोर दुसऱ्या संघाकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याला आता इंग्लिश प्रीमियर लीगऐवजी चॅम्पियन्स लीगमध्ये खेळायचे असल्याचीही माहिती आहे.

मँचेस्टर युनायटेडचा संघ या हंगामात चॅम्पियन्स लीगमध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. गेल्या मोसमात या संघाला एकही करंडक जिंकता आला नव्हता. यानंतरच आता रोनाल्डो या क्लबसोबतचा करार संपुष्टात आणण्याची शक्यता असल्याचे समजते. तथापि, क्लबचे नवे व्यवस्थापक एरिक टेन हॅग यांनी म्हटले की, ‘‘रोनाल्डो क्लबसाठी खेळणार असून युनायटेडला पुन्हा विजयी मार्गावर आणणे त्याच्यावर अवलंबून असेल.’’ गेल्या हंगामात रोनाल्डोने क्लबसाठी २४ गोल केले; परंतु युनायटेडला बहुतेक प्रसंगी पराभव किंवा अनिर्णित राहण्यात समाधान मानावे लागले. त्यामुळे या संघाला एकही विजेतेपद मिळवता आले नाही.

चेल्सी, बायर्न म्युनिचचा पर्याय

रोनाल्डो चेल्सी किंवा बायर्न म्युनिच संघात सामील होऊ शकतो. मात्र, मँचेस्टर युनायटेडसोबतचा करार संपायला अजून त्याला एक वर्ष बाकी आहे. ३७ वर्षीय रोनाल्डोची अजूनही तीन ते चार वर्षे फुटबॉल खेळण्याची इच्छा असल्याचे त्याने काही दिवसांपूर्वी म्हटले होते.

युनायटेडला हवेत १२.९ दशलक्ष पौंड

मँचेस्टर युनायटेडने गेल्या ऑगस्टमध्ये रोनाल्डोला युवेंटसमधून पुन्हा करारबद्ध केले होते. त्यामुळे आता रोनाल्डोला करारातून मोकळे करायचे झाल्यास युनायटेडला युवेंटसला दिलेले १२.९ दशलक्ष पौंड माघारी हवे असल्याची माहिती आता मिळत आहे. दरम्यान, चेल्सीकडे करार करण्यासाठी आवश्यक वित्तपुरवठा आहे, मालक टॉड बोहली यांनी अलीकडेच रोनाल्डोचा एजंट जॉर्ज मेंडेस यांच्याशी चर्चा केल्याचीही माहिती आहे.

Web Title: Football Club Manchester United Cristiano Ronaldo Player Thinking Playing For Another Club

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..