Football World Cup 2022 : आजपासून फुटबॉलचा महाकुंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Football World Cup 2022  FIFA Fan Festival in Doha in Qatar
Lionel Messi Cristiano Ronaldo

Football World Cup 2022 : आजपासून फुटबॉलचा महाकुंभ

दोहा : भूतलावरचा सर्वांत लोकप्रिय खेळ असलेल्या फुटबॉलच्या विश्वकरंडकाचा महोत्सव उद्यापासून (ता. २०) कतारमध्ये सुरू होत आहे. जवळपास महिनाभर रंगणाऱ्या या स्पर्धेचे सर्व वातावरण भारून टाकणारे असणार आहे. फुटबॉलच्या या महाकुंभात ३२ संघांमध्ये एकूण ६४ सामने होणार असून लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, कायलियन एम्बापे आणि करिम बेन्झेमा अशा सुपरस्टार खेळाडूंसह इतरांचाही कौशल्यपूर्ण आणि लयबद्ध खेळ पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यात होणाऱ्या सलामीच्या सामन्याने स्पर्धेचे बिगुल वाजेल. कोरोनानंतर मुक्त वातावरणात होणारी ही ऑलिम्पिकनंतरची दुसरी मोठी बहुराष्ट्रीय स्पर्धा आहे. गतविजेते फ्रान्स, माजी विजेते ब्राझील यांच्यासह अर्जेंटिना, जर्मनी आणि इंग्लंड विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार असतील; परंतु कतारच्या उष्ण वातावरणाशी खेळाडू कसे जुळवून घेतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

फ्रान्सला अधिक संधी

गतविजेत्या फ्रान्सला यंदाही विजेतेपदाची अधिक संधी असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत असला, तरी पात्रता स्पर्धेपासून माजी विजेत्या ब्राझील आणि अर्जेंटिना या देशांच्या संघांनी कमालीची सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. जर्मनी संघात नवोदित खेळाडू असले, तरी तेही पुन्हा विजेतेपदाचा करंडक उंचावू शकतात. युरोपियन आणि अमेरिका खंडातील देशांच्या खेळाडूंना कतारमध्ये खेळण्याचा अनुभव नसल्यामुळे सुरुवातीच्या सामन्यांतील कामगिरी सर्वांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. चार वेळा करंडक उंचावलेला इटलीचा संघ यंदा स्पर्धेसाठी पात्रच ठरला नाही.

सामन्यांचा थरार

३२ संघांची आठ गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० पासून ते मध्यरात्री २.३० पर्यंत फुटबॉल सामन्यांचा थरार पहाता येणार आहे. स्पोर्टस-१८ या वाहिनीवर थेट प्रक्षेपण पहाता येणार आहे.

स्पर्धेचे उद्‌घाटन - सायंकाळी ७.३० वा.

पहिला सामना कतार वि. इक्वेडोर - रात्री ९.३० वा.

उपांत्य फेरी - १३ आणि १४ डिसेंबर

अंतिम सामना - १८ डिसेंबर