फ्रान्स, पोर्तुगालचे सफाईदार विजय

वृत्तसंस्था
Monday, 9 September 2019

फ्रान्स आणि पोर्तुगालने युरो पात्रता फुटबॉल स्पर्धेतील मोहीम पुन्हा रुळावर आणताना बाल्कन देशांविरुद्ध सफाईदार विजय मिळवले. जगज्जेत्या फ्रान्सने अल्बानियास, तर युरो विजेत्या पोर्तुगालने सर्बियाचा पाडाव केला.

पॅरिस : फ्रान्स आणि पोर्तुगालने युरो पात्रता फुटबॉल स्पर्धेतील मोहीम पुन्हा रुळावर आणताना बाल्कन देशांविरुद्ध सफाईदार विजय मिळवले. जगज्जेत्या फ्रान्सने अल्बानियास, तर युरो विजेत्या पोर्तुगालने सर्बियाचा पाडाव केला.

फ्रान्सने अल्बानियाचा 4-1 पाडाव करीत "ह' गटात अव्वल स्थान मिळवले. किग्सली कोमन याने तीन वर्षांत केलेला पहिला आंतरराष्ट्रीय गोल, तसेच ऑलिव्हर गिरॉड आणि बदली खेळाडू जोनाथन इकॉन यांची प्रभावी कामगिरी हे फ्रान्सच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. आईसलॅंडने मोल्दोवास 3-0 हरवून गटात अव्वल क्रमांक मिळवला होता. मात्र फ्रान्स आणि तुर्कीने त्यांना मागे टाकले. ओझान तुफानच्या गोलमुळे तुर्कीने अंदोराचा 1-0 पाडाव केला.

सामन्याचा निकाल नक्कीच सुखावह आहे. आम्ही नक्कीच जास्त गोलाच्या फरकाने जिंकू शकलो असतो, असे फ्रान्सचे मार्गदर्शक दिदिएर देशॅम्प यांनी सांगितले. चुकीचे राष्ट्रगीत वाजवल्याने अल्बानियाने सुरुवातीस खेळण्यास नकार दिला होता, पण लढत सुरू झाल्यावर फ्रान्सच्या खेळाचीच चर्चा झाली.

पोर्तुगालने सर्बियाला 4-2 हरवत स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. त्यानंतरही युक्रेनच गटात आघाडीवर आहे. युक्रेनने लिथुआनियास 3-0 हरवत अव्वल क्रमांक राखला. सर्बियाने पोर्तुगालचा चांगलाच कस पाहिला. चार मिनिटे असताना राजको मितिक याच्या गोलने पोर्तुगालचा विजय निश्‍चित केला.

हॅरी केनच्या हॅट्ट्रिकमुळे इंग्लंडने बल्गेरियाविरुद्धच्या विजयाची औपचारिकता 4-0 अशी पूर्ण केली. केनने याचवेळी आंतरराष्ट्रीय गोलचे पावशतक पूर्ण केले. केनने उत्तरार्धात दोन पेनल्टी किक सत्कारणी लावत हॅट्ट्रिक पूर्ण केली, तसेच इंग्लंडचा तिसरा विजयही निश्‍चित केला. कोसोवाने चेक प्रजासत्ताकला धक्का देत गटातील चुरस कायम ठेवली आहे.

अल्बेनियाची लढत सोडण्याची धमकी
स्टेड डे फ्रान्सवर फ्रान्स-अल्बेनिया लढतीपूर्वी अल्बेनियाचे राष्ट्रगीत वाजवले जाण्यापूर्वी अंडोराचे वाजवण्यात आले. संतप्त अल्बेनिया संघाने मैदान सोडून जाण्याची धमकी दिली. त्यातच या चुकीची माफी मागताना उद्‌घोषकाने अल्बेनियाऐवजी आर्मेनियाची माफी मागितली, त्यामुळे प्रकरण चिघळले. मात्र काही वेळातच अल्बेनियाचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले आणि अखेर पूर्वनियोजित वेळेनंतर दहा मिनिटांनी सामना सुरू झाला. फ्रान्स-अंडोरा लढत मंगळवारी आहे, त्यामुळे ही चूक झाली असावी, असा काहींचा अंदाज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: France, Portugal won in euro qualification