अर्धमॅरेथॉनसाठी शिवछत्रपती क्रीडानगरी सज्ज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

पुणे : भारतीय धावपटूंना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी; तसेच आरोग्यदायी पुण्यासाठी होत असलेल्या बजाज अलियांझ "पुणे हाफ मॅरेथॉन'बाबत पुणेकरांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. स्पर्धेसाठी म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरी सज्ज झाली आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज स्टेडिअमला भेट देऊन स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतला. 

पुणे : भारतीय धावपटूंना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी; तसेच आरोग्यदायी पुण्यासाठी होत असलेल्या बजाज अलियांझ "पुणे हाफ मॅरेथॉन'बाबत पुणेकरांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. स्पर्धेसाठी म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरी सज्ज झाली आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज स्टेडिअमला भेट देऊन स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतला. 

पुण्यात प्रथमच होत असणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येने पुणेकरांनी; तसेच देश-विदेशांतील धावपटूंनी नोंदणी केली आहे. या स्पर्धेसाठी पुण्यातील विविध संस्था, क्रीडापटू, शाळा-महाविद्यालये, गृहनिर्माण सोसायट्या, हौशी धावपटूंचे विविध गट, महापालिकेचे कर्मचारी, पोलिस, लष्कराचे धावपटू यांनी सहभागासाठी नोंदणी केली. ही स्पर्धा जागतिक दर्जाची व्हावी; तसेच पुणेकरांच्या उत्तम आरोग्यासाठी ही स्पर्धा एक सुरवात व्हावी यासाठी त्याचे संयोजन चोख केले जात आहे. त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. त्याचा आढावा पालकमंत्री गिरीश बापट यांनी म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडानगरीत आज पाहणी करून घेतला. या वेळी नगरसेवक महेश लडकत, अमोल बालवडकर, प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर, सुनील माने, क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, सहायक संचालक नवनाथ फडतरे, महापालिकेचे क्षेत्रीय आयुक्त संदीप कदम, पुणे हाफ मॅरेथॉनचे मुख्य कार्यकारी विकास सिंग, वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी आदी उपस्थित होते. 

स्पर्धेत हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याने स्टेडिअममध्ये सर्व व्यवस्था चोख करण्याच्या सूचना बापट यांनी दिल्या. स्टेडिअममधील लाईटची सुविधा, पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, पार्किंगची व्यवस्था याविषयी त्यांनी आढावा घेतला. 

स्पर्धा 9 डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजता सुरू होणार असल्याने या काळात स्पर्धा मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. त्याबाबतही सविस्तर आढावा घेण्यात आला. स्पर्धा मार्गावर धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी दुतर्फा मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या व्यवस्थेबाबतही बापट यांनी आढावा घेऊन संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या. पुणे महापालिकेच्या वतीने सुरू असणाऱ्या स्वच्छ पुणे मोहिमेबाबत जनजागृती करण्यावरही स्पर्धेत भर दिला जाणार आहे. स्पर्धेदरम्यान ढोल-ताशा पथके, विविध कलावंतांची पथके, झुंबासारखे विविध नृत्यप्रकार आदींचा समावेश असल्याने पुणेकरांसाठी ही स्पर्धा उत्सुकता वाढविणारी ठरली आहे. 

पुणे हाफ मॅरेथॉन ही स्पर्धा आरोग्यदायी पुण्यासाठी एक पर्वणी ठरणार आहे. उत्तम जीवनशैलीसाठी उत्तम आरोग्य राखणे आवश्‍यक आहे. त्याचीच सुरवात यानिमित्ताने होत आहे. त्यामुळे ही स्पर्धा अधिकाधिक चांगली होण्यासाठी पुणेकरांचा त्यातील सहभाग महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने स्पर्धेचे नियोजन अधिक चांगले राहील यावर आमचा भर आहे. 
- गिरीश बापट, पालकमंत्री 

सध्या जीवन फार धकाधकीचे झाले आहे. त्यामुळे प्रामुख्याने शालेय-महाविद्यालयीन मुला-मुलींना मानसिक-शारीरिक आरोग्य राखण्यासाठी आणि एकूणच सामाजिक आरोग्य जपण्यासाठी धावण्याची-व्यायामाची नितांत गरज आहे. प्रत्यक्षात मोबाईलमुळे ही पिढी मंत्रमुग्ध होऊन एका जागी खिळून गेली आहे. त्यामुळे ओस पडलेली मैदाने हेल्थ डे व मॅरेथॉनमुळे गजबजून जातील. 
- शोभा शिंदे-भगत, 
शारीरिक शिक्षण संचालिका, श्रीमती सी. के. गोयल कला, वाणिज्य महाविद्यालय, दापोडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girish bapat visits balewadi stadium for pune half marathon