esakal | आयर्लंडविरुद्धचा वचपा काढण्याचेच लक्ष्य 
sakal

बोलून बातमी शोधा

आयर्लंडविरुद्धचा वचपा काढण्याचेच लक्ष्य 

आयर्लंडविरुद्धचा वचपा काढण्याचेच लक्ष्य 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लंडन, मुंबई : सलग दोन सामन्यांतील प्रभावी कामगिरीने आत्मविश्‍वास उंचावलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला सर्वोत्तम कामगिरीच्या बरोबरीचे वेध लागले आहेत. इटलीला पराजित करून भारताने विश्‍वकरंडक हॉकीतील आशियाचे आव्हान कायम राखले. आता साखळीतील आयर्लंडविरुद्धच्या पराभवाचे उट्टे काढण्याचे लक्ष्य साध्य केल्यास संघ आपल्या सर्वोत्तम कामगिरीची किमान बरोबरी साधू शकेल. 
भारतीय संघ 1978 च्या स्पर्धेत सातवा आला होता. त्यानंतर प्रथमच सर्वोत्तम आठ संघात आला आहे. भारताने 1974 च्या पहिल्या स्पर्धेत चौथा क्रमांक मिळविला होता. हीच स्पर्धेतील आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. आता आयर्लंडला हरवल्यास या कामगिरीची बरोबरी शक्‍य होऊ शकेल. 

भारतीय संघ याचा फारसा विचारही करीत नाही. 'या स्पर्धेत आमचा अजून सर्वोत्तम खेळ झालेला नाही. आगामी लढतीत याबरोबरच आयर्लंडविरुद्धच्या पराभवाचा वचपा काढण्याचे आमचे लक्ष्य आहे', असे भारतीय कर्णधार राणीने सांगितले. 
प्रत्येक लढतीगणिक आमचा खेळ उंचावत आहे. इटलीविरुद्धच्या मोठ्या विजयाने आत्मविश्‍वास उंचावला आहे. इटलीविरुद्ध पहिल्या दोन सत्रांत गोल करण्याचे लक्ष्य साध्य केल्याचे समाधान जास्त आहे. साखळीत गोलच्या संधी साधल्या नव्हत्या, त्यात नक्कीच सुधारणा केली आहे. यामुळे उंचावलेला आत्मविश्वास मोलाचा आहे, असेही भारतीय कर्णधाराने नमूद केले. विश्वकरंडक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरीची लढत खेळण्याची संधी मिळाली आहे. ही लढत संस्मरणीय करण्याचे लक्ष्य असल्याचे तिने सांगितले. 

युरोपचेच वर्चस्व 
विश्‍वकरंडक फुटबॉलमध्ये युरोपचे वर्चस्व होते. तेच महिला हॉकीतही आहे. आठपैकी पाच संघ युरोपातील आहेत. भारताने इटलीस हरवून आशियाच्या आशा कायम राखल्या. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिना हे बिगरयुरोपीय संघ आहेत. 

साखळीत आम्ही आयर्लंडविरुद्ध पराजित झालो होतो; पण त्या सामन्यातही आमचा खेळ चांगला झाला होता. त्या वेळी गोल करण्यात अपयशच आले. आता त्यांना उपांत्यपूर्व फेरीत पराजित करण्याची आम्हाला चांगली संधी आहे. 
- राणी रामपाल, भारतीय कर्णधार 

थेट प्रक्षेपण : रात्री 10.30 पासून स्टार स्पोर्टस्‌ टू आणि डीडी स्पोर्टस्‌ 

loading image
go to top