
बॅडमिंटनमध्ये आज सुवर्ण इतिहास?
बँकॉक : पाच वेळा विजेतेपद मिळवणारे मलेशिया, त्यानंतर ताकदवर डेन्मार्क अशा मातब्बर संघांना गारद करत थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारणाऱ्या भारतीय संघाने आता इंडोनेशिया संघालाही पराभूत करण्याचे स्वप्न बाळगले आहे. भारतीय वेळेनुसार उद्या दुपारी ११.३० वाजता सुवर्णपदकाचा हा मुकाबला होणार आहे. इंडोनेशियाने सर्वाधिक १४ वेळा थॉमस करंडक जिंकलेला आहे, परंतु भारतीय संघ आता इतिहासापेक्षा वर्तमानाचा आत्मविश्वास बाळगून आहे. त्यामुळे समोर कोणता प्रतिस्पर्धी आहे यापेक्षा आपल्या खेळावर विश्वास भारतीय संघाने बाळगला आहे.
सांघिक बॅडमिंटन म्हणून प्रसिद्ध असलेली थॉमस करंडक स्पर्धा बॅडमिंटन विश्वात सर्वात प्रतिष्ठेची समजली जाते. पदकाच्या शर्यती येण्याची आणि अंतिम फेरी गाठण्याची भारताची पहिली वेळ असली तरी उद्यापासून भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. एकेरीतील अनुभवी खेळाडू किदांबी श्रीकांत आणि एच. एस. प्रणोय यांनी जबाबदारी समर्थपणे आपल्या खांद्यावर घेतली आहे; तर सात्विकराज आणि चिराग शेट्टी दुहेरीतील आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध करत आहेत. त्यांच्यामुळे भारताने मलेशिया आणि डेन्मार्कला पराभूत करण्याची क्षमता दाखवली. या दोन्ही लढतींमध्ये दुहेरीची दुसरी जोडी कृष्ण प्रसाद आणि विष्णुवर्धन अपयशी ठरले होते. त्यामुळे उद्याच्या सामन्यात एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते.
या स्पर्धेच्या सुरुवातीला अन्नातून विषबाधा झालेला लक्ष्य सेन टप्प्याटप्प्यात चांगला खेळला आहे, मात्र गेल्या दोन सामन्यांत त्याला विजय मिळवता आलेला नाही. डेन्मार्कचा सुपरस्टार एक्ललसेनविरुद्ध त्याने लढा दिला, परंतु तो जास्त थकलेला दिसत होता. उद्या लक्ष्य सेनचा मुकाबला जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या अँथोनी जिंतिंगविरुद्ध होणार आहे. मार्च महिन्यात जर्मन ओपनमध्ये अँथोनीवर लक्ष्य सेनने सहज मात केली होती. उद्या अशाच कामगिरीची त्याच्याकडून अपेक्षा आहे.
श्रीकांतचा सामना जागतिक क्रमवारीतील ८ व्या मानांकित जोनाथन ख्रिस्तीविरुद्ध होण्याची शक्यता आहे. या दोघांमधील लढतींचे ४ः५ असे समीकरण आहे.
आमचा संघ समतोल आहे. दुहेरीची जोडी निर्णायक योगदान देत आहे, सर्वच खेळाडू फॉर्मात असून अटीतटीच्या सामन्यांत विजय खेचून आणले आहेत, त्यामुळे उद्या विजेतेपदासाठी ५०ः५० टक्के संधी आहे.
- विमल कुमार, भारतीय संघासह असलेले माजी प्रशिक्षक
Web Title: Golden History Today Thomas Cup Badminton Indias Match Against Malaysia
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..