मार्गदर्शकांचा मान वाढावा, तसेच धनही - गोपीचंद

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

मुंबई - भारतात मार्गदर्शकांना मान मिळत नाही; तसेच धनही. मात्र, नुकत्याच निवृत्त झालेल्या खेळाडूंनी व्यावसायिकतेचा पूर्ण विचार न करता ही जबाबदारी स्वीकारायला हवी, असे मत भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन मार्गदर्शक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले.

मुंबई - भारतात मार्गदर्शकांना मान मिळत नाही; तसेच धनही. मात्र, नुकत्याच निवृत्त झालेल्या खेळाडूंनी व्यावसायिकतेचा पूर्ण विचार न करता ही जबाबदारी स्वीकारायला हवी, असे मत भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन मार्गदर्शक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले.

गोपीचंद यांच्या साथीला नुकतेच इंडोनेशियाचे मार्गदर्शक आले आहेत. त्यांच्या सहकार्याचा मला नक्कीच लाभ होईल. भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीयस्तरावर प्रगती करीत असताना याची आवश्‍यकताच होती, असेही त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंच्या लढती एकाच वेळी होण्याचे प्रमाण वाढत असताना मार्गदर्शक वाढवण्याची गरज आहे का, या प्रश्‍नावर गोपीचंद यांनी मार्गदर्शकांच्या मान; तसेच धनाचा प्रश्‍न येत असल्याचे सांगितले. मुंबई रॉकेट्‌स या प्रीमियर बॅडमिंटन लीगमधील जर्सीचे अनावरण झाल्यानंतर गोपीचंद यांनी निवडक पत्रकारांशी संवाद साधला, त्या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.

भारतात शालेय, महाविद्यालयीन स्तरावरही शिक्षकांना मान मिळत नाही. हेच सर्वत्र घडत असते. त्यांचा मान वाढायला हवा; तसेच आपल्याकडे जास्त कोणी मार्गदर्शक होण्यास तयार नसते. नुकत्याच निवृत्त झालेल्या खेळाडूंनी ही जबाबदारी घ्यायला हवी. खरे तर त्यांनी त्या वेळी पूर्ण आर्थिक फायद्याचा विचार करणे चुकीचे आहे. आपल्याला नक्कीच चांगल्या मार्गदर्शकांची गरज आहे आणि ती पूर्ण होईल. राष्ट्रीय संघासाठी मोठ्या प्रमाणावर मार्गदर्शक नियुक्त होण्यास दोन ते तीन वर्षे लागतील.

प्रशिक्षक घडवण्यासाठी आपण परदेशात जाण्याचीही गरज नाही. काही वर्षांतील बॅडमिंटनमधील भारताची प्रगती चीनखालोखाल आहे. आपण चांगले यश मिळवत आहोत. इंडोनेशिया, मलेशियाही आता मागे पडत आहेत. या परिस्थितीत आपल्या खेळाडूंतूनच मार्गदर्शक घडवणे योग्य होईल. त्यांनीच ही जबाबदारी घ्यायला हवी. खेळातील आपली प्रगती पाहता, मार्गदर्शकांचाही सन्मान वाढेल, असेही त्यांनी सांगितले.

सिंधूबाबत 2013 मध्ये सांगितले होते, तेच पुन्हा सांगतोस, सिंधूची अजूनही सर्वोत्तम कामगिरी झालेली नाही. ती खूपच इमोशनल आहे. त्याचा प्रसंगी खेळावर परिणाम होतो. एखाद दुसऱ्या सामन्यातील पराभवाचा कारकिर्दीवर मोठा परिणाम होत नाही, हे तिने पूर्णपणे समजून घ्यायला हवे. ती 21 वर्षांची आहे. जागतिक, राष्ट्रकुल, आशियाई, ऑलिंपिक पदक जिंकले आहे. तिने खूप काही साध्य केले आहे, यास मी महत्त्व देतो, जे काय झालेले नाही, त्यास महत्त्व देणे, त्याचा जास्त विचार करणे गैर आहे.
- पुल्लेला गोपीचंद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guides to increase their value - gopichand