Harbhajan Singh : पाकिस्तानात खेळण्याबाबत हरभजनचं मोठं विधान, म्हणाला बीसीसीआयने... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Harbhajan Singh

Harbhajan Singh : पाकिस्तानात खेळण्याबाबत हरभजनचं मोठं विधान, म्हणाला बीसीसीआयने...

Harbhajan Singh : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप 2023 च्या यजमानपदावरून घमासान सुरू आहे. आशिया कप 2023 हा पाकिस्तानात आयोजित करण्यासाठी पीसीबी आग्रही आहे तर बीसीसीआय भारतीय संघ पाकिस्तानात पाठवण्यास तयार नाही. यामुळे आशिया कप त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात यावी अशी बीसीसीआयची मागणी आहे.

एशियन क्रिकेट काऊन्सीलने भारताचे मत उचलून धरत आशिया कप 2023 हा त्रयस्थ ठिकाणी होईल असा निर्णय घेतला आहे. मात्र पाकिस्तान अजूनही या विषयावरून आकांडतांडव करत आहेत. जर भारत पाकिस्तानात आशिया कप खेळण्यासाठी आला नाही तर पाकिस्तानही वनडे वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात येणार नाही अशी धमकी पीसीबी देत आहे.

आता या विषयी भारताचा माजी फिरकीपटू आणि आपचा खासदार हरभजन सिंगने एक महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे.

हरभजन सिंग इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाला की, 'मला वाटते की बीसीसीआय योग्य आहे. आपण आपला संघ पाकिस्तानात पाठवू नये. आताही कराची स्टेडियमजवळ गोळीबार झाला आहे. तुम्ही ज्या ठिकाणी सतत काही ना काही घडत असते अशा ठिकाणी आपला संघ पाठवू शकत नाही. ज्या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न उद्भवतो तेथे खेळाडूंना पाठवू नये.'

दरम्यान, पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार आशिया कप आयोजनाच्या वादावर एक पर्याय काढला जाऊ शकतो. यात पाकिस्तानात आशिया कप आयोजित केला जाईल मात्र भारताचे सामने हे संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवले जातील.

याबाबतचा प्रस्ताव देण्यात येईल असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील सूत्रांनी सांगितले आहे. अशा परिस्थितीत संयुक्त अरब अमिराती जर भारत फायनलमध्ये पोहचला तर आशिया कप 2023 ची फायनल आयोजित करेल.

(Sports Latest News)

हेही वाचा : डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही