नशीब इतकं बेकार असू शकत नाही... आज हे अपेक्षित नव्हतं, कर्णधार भावूक | Harmanpreet Kaur IND vs AUS | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Harmanpreet Kaur IND vs AUS Women's T20 World Cup

Harmanpreet Kaur IND vs AUS : नशीब इतकं बेकार असू शकत नाही... आज हे अपेक्षित नव्हतं, कर्णधार भावूक

Harmanpreet Kaur IND vs AUS : महिला टी 20 वर्ल्डकप 2023 च्या सेमी फायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाला भारताने जवळपास पाणी पाजले होतेच. मात्र 5 वेळच्या वर्ल्डकप विजेत्या ऑस्ट्रेलियाने शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात भारताचा अवघ्या 5 धावांनी पराभव केला. भारताकडून हरमनप्रीत कौरने 52 धावांची तर जेमिमाह रॉड्रिग्जने 43 धावांची झुंजार खेळी करत कांगारूंच्या 173 धावांच्या तगड्या आव्हानाला चांगले प्रत्युत्तर दिले. मात्र भारताला 20 षटकात 8 बाद 167 धावांपर्यंतच मजल मारता आली.

भारताच्या अवघ्या 5 धावांनी झालेल्या पराभवानंतर झुंजार कर्णधार हरमनप्रीत कौर भावूक झाली. सामन्यानंतर ती म्हणाली, 'इतकं नशीब बेकार असू शकत नाही. मी आणि जेमिमाह फलंदाजी करत असताना आम्ही सामन्याचे पारडे आमच्या बाजूने झुकवले होते. त्यानंतर जे झालं ते आज अपेक्षित नव्हतं. ज्या प्रकारे मी धावबाद झाले. यापेक्षा बेकार नशीब काय असू शकतं. आम्ही प्रयत्न केले हे खूप महत्वाचं होतं. आम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत लढण्याबाबत चर्चा केली होती.'

हरमन पुढे म्हणाली, 'निर्णय आमच्या बाजूने लागला नाही. मात्र आम्ही ज्या प्रकारे वर्ल्डकप खेळला त्यावर अभिमानी आहे. जरी पहिल्यांदा विकेट्स पडल्या असल्या तरी आम्हला माहिती होतं की आमच्याकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे. आज जेमिमाहने ज्या प्रकारे फलंदाजी केली ते पाहता श्रेय तिलाच द्यावे लागेल. तिने आम्हाला जी लय हवी होती ती मिळवून दिली. अशी कामगिरी पाहून आनंद होतो.'

'असे असेल तरी आम्ही आमच्या क्षमतेनुसार खेळ केला नाही. आम्ही सेमी फायनल गाठली. आम्ही सोपे झेल सोडले. आम्हाला जर जिंकायचं असेल तर हे झेल घेणे गरजेचे आहे. आम्ही ढिसाळ क्षेत्ररक्षण केले. आम्हाला यातून शिकायला हवे आणि चुकांची पुनरावृत्ती टाळावी लागेल.' हरमनप्रीत कौरने आजच्या सामन्यात झालेल्या ढिसाळ क्षेत्ररक्षणावरून वक्तव्य केले.

(Sports Latest News)

हेही वाचा : का वाढतात रिअल इस्टेटचे भाव?