हिमासमोर यशाबरोबर आव्हान वेळ सुधारण्याचे 

नरेश शेळके 
मंगळवार, 23 जुलै 2019

हिमा दास ही भारतात आता एक सेलीब्रिटी झाली आहे. तिच्याशी संबंधित प्रत्येक घटनेला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गतवर्षी चारशे मीटरमध्ये कुमार गटात विश्‍वविजेतेपद मिळविल्यानंतर ती तमाम भारतीयांच्या गळ्यातील ताईत झाली आहे. आता वीस दिवसांत तिने युरोपातील विविध स्पर्धेत पाच सुवर्णपदके जिंकल्यानंतर तर सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करणाऱ्यांचा महापूर आला आहे.

हिमा दास ही भारतात आता एक सेलीब्रिटी झाली आहे. तिच्याशी संबंधित प्रत्येक घटनेला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गतवर्षी चारशे मीटरमध्ये कुमार गटात विश्‍वविजेतेपद मिळविल्यानंतर ती तमाम भारतीयांच्या गळ्यातील ताईत झाली आहे. आता वीस दिवसांत तिने युरोपातील विविध स्पर्धेत पाच सुवर्णपदके जिंकल्यानंतर तर सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करणाऱ्यांचा महापूर आला आहे.

आसाममधील पूरस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तिने आपले मानधन पूरग्रस्तांना देऊन सामाजिक बांधीलकी जपली. यामुळे तिचे अधिक कौतुक झाले. हिमाने दाखवलेली सामाजिक बांधीलकी नक्कीच कौतुकास्पद आहे. ही बांधीलकी तिने कारकिर्दीबाबतही दाखवायला हवी. नुसत्या कामगिरीवर पुढे जाता येत नाही, तर त्यासाठी वेळ उंचावणे आवश्‍यक आहे. त्याचवेळी सहभागी व्हायच्या स्पर्धांची अचूक निवड या विसरल्या जाणाऱ्या गोष्टीकडेही लक्ष देण्याची गरज आहे. अनुभव मिळतो म्हणून प्रत्येक स्पर्धेत धावत बसली, तर कामगिरी उंचावण्याबरोबर थकवादेखील जाणवू शकतो. अर्थात यामुळे तिचे या युरोप दौऱ्यातील श्रेय कमी होत नाही. पुढील वाटचालींसाठी ते तिला प्रेरक ठरावे. पण, नुसते प्रेरक ठरून उपयोगाचे नाही, तर त्यात सातत्य असायला हवे आणि हे आव्हान तिने ओळखण्याची गरज आहे.

 हिमाच्या या पाच सुवर्णपदकानंतर भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाचे हाय परफॉर्मन्स संचालक वोकर हेर्मान म्हणाले की, हिमा आपल्या सर्वोत्तम कामगिरीच्या जवळ आहे. हे वाक्‍य काही पटण्यासारखे नाही. कारण हिमाला अजून बराच लांब पल्ला गाठायचा आहे, हे सध्या चारशे मीटरमधील जगातील इतर धावपटूंची कामगिरी पाहिली तर लक्षात येईल.

एखाद्या खेळाडूचे विश्‍लेषण करताना पदक आणि कामगिरी हे दोन भाग असतात. पदकाचा विचार केला, तर हिमाचे पाऊल पुढे पडले. परंतु, कामगिरीचे म्हणाल, तर तिला आणखी वेगाने पळावे लागेल. ती अद्याप आगामी जागतिक मैदानी स्पर्धेसाठी पात्र ठरलेली नाही. बहुधा युरोपातील दौरा आटोपून ती भारतात दाखल होईल आणि पात्रता गाठण्यासाठी पुढील महिन्यात लखनऊ येथील आंतरराज्य स्पर्धेत सहभागी होईल. नाही म्हटले तरी लखनऊत तिच्या पुढे पी. टी. उषाची शिष्या जिस्ना मॅथ्यू आणि सध्या जबरदस्त फार्मात असलेल्या व्ही. के. विस्मय्याचे कडवे आव्हान राहील. 
गतवर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहावे स्थान आणि नंतर ज्युनिअर विश्‍व स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर ती जकार्ता येथे आशियाई स्पर्धेसाठी दाखल झाली. त्यावेळी बहरिनची सल्वा नासेर तिची प्रमुख प्रतिस्पर्धी होती. मात्र, सल्वाने हिमाला आसपासही फिरकू दिले नाही, हे सत्य आहे.

तेव्हापासून आशियाई पातळीवर हिमा विरुद्ध सल्वा असे चित्र रंगविण्यात आले. मात्र, यंदाच्या मोसमातील दोघींच्या कामगिरीकडे पाहिले तर फरक लगेच डोळ्यासमोर येईल. कामगिरीच्या आघाडीवर सल्वा डायमंड लीगपर्यंत पोचली, तर हिमा ग्रांप्री आणि युरोप दौऱ्यात अडकली. दोन वर्षांपूर्वी विश्‍व स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या सल्वाने 2017, 18, 19 मोसमात डायमंड लीगमध्ये चारशे मीटरची एकही शर्यत गमावेली नाही. याउलट हिमाला अजून डायमंड लीगमध्ये प्रवेशही मिळविता आलेला नाही.

हिमाच्या सध्याच्या कामगिरीची तुलना क्रिकेटपटूंशी करायची झाल्यास असे म्हणता येईल की, शिखर धवनने दुखापतीनंतर पुनरागमन करताना प्रत्येक सामन्यात 20-30 धावा केल्या आणि आपण कौतुक करायचे. हिमा युरोपातील ज्या स्पर्धेत धावली, त्या स्पर्धेत इतर भारतीय ऍथलिट्‌सनी गेल्यावर्षी भाग घेतला होता आणि सुवर्णपदकही जिंकले होते. परंतु, पुवम्मा, ए. धारून यांना हिमाप्रमाणे सेलीब्रिटी स्टेटस नसल्याने त्यांच्या सुवर्णपदकांची कधी चर्चा झाली नाही. तरीही हिमाचे पदक भारतीयांना आनंद देण्यासाठी पुरेसे असले तरी भविष्याचा (जागतिक आणि ऑलिंपिक) विचार केला तर हिमाला शंभर मीटरच्या वेगाने चारशे मीटरची शर्यत पळावी लागेल, असेच म्हणावे लागेल.

2019 क्रमवारी 
कामगिरीनुसार : 
400 मीटर 
खेळाडू जागतिक स्थान वेळ 
सल्वा नासेर - दुसरी - 49.17 सेकंद 
हिमा दास - 75 वी - 52.09 सेकंद 

आशिया 
सल्वा नासेर - प्रथम - 49.17 सेकंद 
हिमा दास - दुसरी - 52.09 सेकंद 

मानांकनानुसार :
खेळाडू जागतिक स्थान गुण 
सल्वा नासेर - प्रथम - 1412 
हिमा दास - 87 वी - 1121 

आशिया 
सल्वा नासेर - प्रथम 
हिमा दास - सहावी 

कामगिरीनुसार : 200 मीटर 
खेळाडू जागतिक स्थान वेळ 
सल्वा नासेर - 14 वी - 22.51 सेकंद 
हिमा दास - पहिल्या शंभरात नाही (128) 

मानांकनानुसार 
सल्वा नासेर - नववी - 1273 गुण 
हिमा दास - स्थान नाही. 

कारकिर्दीतील सर्वोत्तम वेळ 
सल्वा नासेर (400 मीटर - 49.08 सेकंद) 
हिमा दास (400 मीटर - 50.79 सेकंद) 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hima das needs to improve her timings writes Naresh Shelke