ICC च्या नियमांमध्ये दोन मोठे बदल; कर्णधारांना दिलासा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जुलै 2019

- आयसीसीच्या नियमांमध्ये दोन मोठे बदल
- षटकांचा वेग राखला नाही तरी कर्णधाराच्या मानधनातून पैसे कापले जाणार नाहीत, संपूर्ण संघाला दंड भरावा लागेल
- संघातील एखादा खेळाडू चेंडू लागून जखमी झाल्यास त्याच्याऐवजी बदली खेळाडूला संघात स्थान मिळणार 

लंडन : आयसीसीने क्रिकेटच्या नियमांत जोन मोठे बदल केले आहेत. या नियमांमुळे कर्णधाराला मोठा दिलासा मिळणार आहे. आयसीसीच्या वार्षिक परिषदेत हे निर्णय घेण्यात आले. 

धीम्यागतीने गोलंदाजी केल्याबद्दल यापुढे कर्णधारावर निलंबनाची कारवाई केली जाणार नाही. याऐवजी संपूर्ण संघाला दंड केला जाणार आहे. त्यामुळे यापुढे षटकांचा वेग राखला नाही तर कर्णधार आणि संघातील अन्य खेळाडूंना समान दंड केला जाणार आहे. तसेच या कारणामुळे कर्णधारावर निलंबनाची कारवाई केली जाणार नाही याऐवजी आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप दरम्यान त्या संघांचे गुण कमी केले जातील.

यापूर्वी षटकांचा वेग कमी राखला तर  कर्णधाराला मानधनाच्या 50 टक्के दंड केला जात असे तर संघातील अन्य खेळाडूंच्या मानधनातून प्रत्येकी 10 टक्के रक्कम कपात केली जात असे. तर सलग 3 सामन्यात असे झाले तर कर्णधारावर निलंबनाची कारवाई केली जात होती. मात्र, आता केलेल्या नवीन नियमांनुसार कर्णधाराला दिलासा मिळाला आहे.

बदली खेळाडू मिळणार

आयसीसीने आणखी एक नियम बदलला आहे. त्यानुसार एखादा खेळाडू चेंडू लागल्याने जखमी झाला तर त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संघात घेता येऊ शकते. गोलंदाज जखमी झाला तर गोलंदाज आणि फलंदाज जखमी झाला तर बदली फलंदाजाला संघात स्थान दिले जाईल.  येत्या 1 ऑगस्टपासून हा नियम लागू होईल. याची सुरुवात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेपासून सुरुवात होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ICC made two changes in rules which might be helpful for captains