भारतीयांची सुरक्षा पाकने ऐनवेळी रद्द केली तर...

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डेव्हिस करंडक टेनिस लढतीबाबत भारतीय टेनिस संघटना आणि आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ यांच्यात सोमवारी चर्चा होईल, पण त्यापूर्वी भारतीय टेनिस संघटनेने पाकिस्तानात खेळण्याची तयारी नसल्याचे जणू स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डेव्हिस करंडक टेनिस लढतीबाबत भारतीय टेनिस संघटना आणि आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ यांच्यात सोमवारी चर्चा होईल, पण त्यापूर्वी भारतीय टेनिस संघटनेने पाकिस्तानात खेळण्याची तयारी नसल्याचे जणू स्पष्ट केले आहे.

लढत त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाचाच असतो. त्यासाठी आम्ही विनंती करण्याची काही गरजच नाही, असे भारतीय टेनिस संघटनेने सांगितल्यावर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ चर्चेस तयार झाले आहेत. याबाबत माहिती देताना भारतीय संघटनेचे सचिव हिरोण्मय चॅटर्जी यांनी पाकिस्तानात खेळण्याचा धोकाच अधोरेखित केला.

डेव्हिस लढतीच्या सुरळीत तसेच सुरक्षित संयोजनासाठी पाकिस्तान टेनिस संघटनेने काय उपाय केले आहेत, याची माहिती आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने भारतास दिली; पण त्यानंतरही भारतीय संघटना त्यावर समाधानी नाही. पाकिस्तानातील लढत अन्यत्र घेण्याबाबत किंवा पुढे ढकलण्याबाबत आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने कोणतीही टिप्पणी करणे टाळले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडलेले आहेत. दोन देशांतील तणाव सतत वाढत आहे. पाकिस्तानने भारताबरोबरील संबंध कमी केले आहेत. आता पाकिस्तानात जाणाऱ्या भारतीय संघास सुरक्षा पाकिस्तान सरकार देणार आहे. तेथील लोकांची भावना लक्षात घेऊन पाकिस्तान सरकारने संघाची सुरक्षा काढून घेतली तर... या परिस्थितीत आपण हतबलच असणार. आम्ही हा धोका कसा पत्करणार, अशी विचारणा चॅटर्जी यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: if pakistan withdrew security at the last movement, AITA asked