
IND vs AUS: कसोटीसाठी 'जामठा' स्टेडियम हाऊसफुल्ल! दोन हजार पोलिस तैनात अन्...
India vs Australia Test : वनडे किंवा टी-20 सामन्यांच्या तिकिटांची हातोहात विक्री झाली, तर नवल वाटू नये; पण पाच दिवस चालणाऱ्या कसोटी सामन्यांची काही महागडी वगळता इतर तिकिटांची विक्री झाली. मैदानाची क्षमता 45 हजार असून 42 हजार तिकिटे संपली आहेत. यात व्हीसीए सदस्य आणि शाळकरी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या तिकिटांचा समावेश आहे. कसोटीसाठी या वेळी जामठा स्टेडियम प्रथमच हाऊसफुल्ल राहणार आहे.
पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी VCA स्टेडियमवर किमान दोन हजार पोलिस तैनात असतील. एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. शहरातील संघांच्या दोन हॉटेलपासून जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन (व्हीसीए) स्टेडियमकडे जाणाऱ्या मार्गावर क्यूआरटी कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
साधारणपणे नागपूर व विदर्भातील क्रिकेटप्रेमी कसोटीऐवजी वनडे किंवा टी-20 सामने पाहणे पसंत करतात. त्या तुलनेत कसोटी सामान्यांना अल्प प्रतिसाद असतो. आजवरचा तो अनुभव आहे. मात्र या वेळी ही परंपरा मोडीत निघाली आहे. क्रिकेटप्रेमी प्रेक्षकांच्या कसोटी सामन्यावरही उड्या पडल्या आहेत. मिळालेल्या
माहितीनुसार, मंगळवारपर्यंत जवळपास 42 हजार तिकिटांची विक्री झाली आहे. यात बहुतांश तिकिटे कमी किमतीची आहेत. फक्त मोजकी महागडी तिकटे शिल्लक आहेत. ऑनलाइन तिकीटविक्रीला मिळालेला जोरदार प्रतिसाद लक्षात घेता, 45 हजार प्रेक्षकक्षमता असलेले जामठा स्टेडियम पाचही दिवस हाऊसफुल्ल राहण्याची शक्यता आहे. शालेय विद्यार्थ्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
क्रिकेटप्रेमींमधील उत्सुकतेबाबत प्रतिक्रिया देताना रोहित शर्मा म्हणाला, ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण कसोटीला गर्दी होणे म्हणजे लोकांना चांगले क्रिकेट पाहायचे आहे. येथे आल्यावर नागपूरच्या क्रिकेटप्रेमींचा मिळणारा प्रतिसाद नेहमीच उत्साहवर्धक असतो. यापूर्वी 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीच्या वेळेही बरीच गर्दी झाली होती. त्या वेळी सुनील गावसकर यांनी विदर्भ क्रिकेट संघटनेचे कौतुक केले होते.