
IND vs AUS: टीम इंडियाने घातली बॉर्डर गावसकर ट्रॉफीला गवसणी! ऑस्ट्रेलियाने चौथ्यांदा टेकले गुडघे
Border Gavaskar Trophy 2023 India Win : ऑस्ट्रेलियन संघाने भारताविरुद्धची अहमदाबाद कसोटी निश्चितच ड्रॉ केली, पण लाजिरवाणे होण्यापासून ते स्वतःला वाचवू शकले नाहीत. भारताने ही मालिका 2-1 अशी खिशात घातली. अशाप्रकारे भारतीय संघाने बॉर्डर गावसकर मालिकेत सलग चौथ्यांदा कांगारू संघाचा पराभव केला आहे.
2016 पासून ऑस्ट्रेलियाला भारताने दोनदा त्याच्या घरी आणि दोनदा आपल्या घरी गुडघ्यावर आणले. नरेंद्र मोदी स्टेडियमवर 5 व्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावाच्या अखेरपर्यंत फलंदाजी सुरू ठेवली आणि 2 गडी गमावून 175 धावा केल्या. सामना अनिर्णित घोषित होण्यास सुमारे एक तासाचा खेळ शिल्लक होता.
याआधी भारतीय संघाने सलग तीनवेळा ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. यामध्ये 2017 मधील घरच्या मालिकेव्यतिरिक्त 2018-19 आणि 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर जाऊ भारताने कांगारूला पराभवाची धूळ चारली. दुसरीकडे न्यूझीलंडने ख्राईस्टचर्चमध्ये श्रीलंकेवर दोन गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला ज्यामुळे भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम फेरीत पोहोचला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2021-23 चक्रातील ही भारताची शेवटची मालिका होती. या विजयासह टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलियन संघ आधीच अंतिम फेरीत पोहोचला होता. आता हे दोन्ही संघ इंग्लंडमध्ये 7 ते 11 जून दरम्यान अंतिम सामना खेळणार आहेत.
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उस्मान ख्वाजाच्या 180 आणि कॅमेरून ग्रीनच्या 114 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या. भारताकडून रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या.
प्रत्युत्तरात भारताने शुभमन गिलच्या 128, विराट कोहलीच्या 186 आणि अक्षर पटेलच्या 79 धावांच्या जोरावर 571 धावा केल्या. नॅथन लायन आणि टॉड मर्फी यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. पहिल्या डावाच्या जोरावर भारताला 91 धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 2 बाद 172 धावा केल्या आणि सामना अनिर्णित राहिला.