IND vs AUS: पावसाचे संकट, तरीही पाटा खेळपट्टीवर गोलंदाजांची अग्निपरीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs AUS: पावसाचे संकट, तरीही पाटा खेळपट्टीवर गोलंदाजांची अग्निपरीक्षा

IND vs AUS: पावसाचे संकट, तरीही पाटा खेळपट्टीवर गोलंदाजांची अग्निपरीक्षा

IND vs AUS : मोहाली येथील पहिल्या टी-२० सामन्यात धावांचा पाऊस पडल्यानंतर नागपुरातही असेच काहीसे चित्र दिसणार आहे. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडिअमची खेळपट्टी पाटा असल्यामुळे नागपूरकरांना चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळणार आहे.

यजमान भारत आणि विश्वविजेता ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या २३ सप्टेंबरला जामठा स्टेडियमवर दुसरा टी-२० सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाने मोहालीचा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी ही लढत एक प्रकारे 'करो या मरो' अशीच राहणार आहे. जामठ्याची खेळपट्टी पाटा असल्याने सामन्यात निश्चितच धावांचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे स्टेडियमवर उपस्थित ४५ हजार प्रेक्षकांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी व मेजवानी राहणार आहे.

हेही वाचा: IND vs AUS: टीम इंडियाला 'या' खेळाडूला न घेणं पडलं महागात; बसला मोठा फटका

शहरात मंगळवार व बुधवारी रात्रभर हलका पाऊस झाला. शिवाय हवामान विभागाने आणखी दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे संपूर्ण मैदानावर कव्हर झाकण्यात आले आहे. परिणामतः खेळपट्टीत किंचित ओलावा राहण्याची दाट शक्यता आहे. या परिस्थितीत सुरुवातीच्या काही षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना. थोडीफार मदत मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा: IND vs AUS: टीम इंडिया पोहोचली नागपुरात, जाणून घ्या कसा आहे रेकॉर्ड

राहुलसाठी जामठा स्टेडियम 'लकी'

के. एल. राहुलसाठी जामठा स्टेडियम 'लकी' राहिले आहे. या मैदानावर आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने अर्धशतके नोंदवून भारताच्या विजयात निर्णायक योगदान दिले आहे. जानेवारी २०१७ मध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात राहुलने अवघ्या ७१ धावा ठोकून भारताला पाच धावांनी रोमांचक विजय मिळवून दिला होता. त्यानंतर बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या टी-२० लढतीतही त्याने ५२ धावा काढून संघाला दणदणीत विजय मिळवून दिला होता.

Web Title: Ind Vs Aus Rain Likely To Play Spoilsport During 2nd T20i Between India Vs Australia Nagpur Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..