IND vs AUS WT20: टीम इंडियासाठी हा चिंतेचा विषय! उपांत्य फेरीत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी सामना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ind vs Aus Harmanpreet Kaur on India facing Australia in Women's T20 World Cup semi-final cricket news in marathi kgm00

IND vs AUS WT20: टीम इंडियासाठी हा चिंतेचा विषय! उपांत्य फेरीत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी सामना

Women's t20 World Cup 2023 Ind vs Aus : भारतीय महिला क्रिकेट संघाने सोमवारी आयर्लंडवर डकवर्थ लुईस नियमानुसार पाच धावांनी विजय मिळवला आणि टी-२० विश्‍वकरंडकाच्या उपांत्य फेरीत मजल मारली. मात्र यापुढील प्रवास खडतर असणार आहे. हे लक्षात घेऊन कर्णधार हरमनप्रीत कौर हिने निर्धाव चेंडू आमच्यासाठी चिंतेचा विषय असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

भारतीय संघाला इंग्लंडकडून ११ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या लढतीत भारतीय फलंदाजांनी ५१ चेंडू निर्धाव खेळले. आयर्लंडविरुद्धच्या लढतीत पावसाचा व्यत्यय आला. अखेर पाच धावांनी भारतीय संघ जिंकला. या लढतीत भारतीय फलंदाजांनी ४१ चेंडू निर्धाव खेळले. याबाबत हरमनप्रीत म्हणाली, आमच्या बैठकीत निर्धाव चेंडूवर चर्चा करण्यात आली आहे. प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाज अव्वल दर्जाची गोलंदाजी करतात, तेव्हा निर्धाव चेंडू खेळले जातात. विश्‍वकरंडकात दोन्ही संघांवर एकसारखाच दबाव असतो. त्यामुळे अधिक दबाव न घेता १५० धावसंख्या करायला बघायची. यामुळे लढतीत आमचे पारडे जड होईल. हेच आम्ही ठरवले आहे, असे हरमनप्रीत आवर्जून सांगते.

हरमनप्रीत पुढे म्हणाली, आम्ही आता उपांत्य फेरीची लढत जिथे होणार आहे, तिथे जाणार आहोत. त्यानंतर तेथील खेळपट्टी व वातावरण याचा अंदाज घेऊ. परिस्थितीनुसार खेळ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. निर्धाव चेंडू कमीत कमी असावेत, याकडे लक्ष देणार आहोत. पुढील लढतीत आमच्या खेळात सुधारणा झालेली नक्कीच आवडणार आहे, असे हरमनप्रीत स्पष्ट करते.

भारतासमोर उपांत्य फेरीच्या लढतीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान असण्याची शक्यता आहे. याबाबत हरमनप्रीत म्हणाली, ऑस्ट्रेलियन संघ हा ताकदवान संघ आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध खेळायला नेहमीच मजा येते. कारण त्यांच्याविरुद्ध चांगली कामगिरी केल्यानंतर आत्मविश्‍वास उंचावतो; पण या लढतीत आम्ही दबावाखाली न खेळता ही लढत एन्जॉय करणार आहोत, असे ती नमूद करते.

टी-२० विश्‍वकरंडकाआधी भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत भारतीय संघाला ४-१ असा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला; मात्र ही मालिका भारतासाठी फायदेशीर ठरली, असे मत हरमनप्रीतकडून व्यक्त करण्यात आले. ती म्हणाली, ऑस्ट्रेलियाविरुद्ध आम्ही पाच आंतरराष्ट्रीय लढती खेळलो. त्यानंतर एक सराव सामना खेळलो. आम्हाला या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या भक्कम बाजू व कमकुवत बाजू समजल्या आहेत. एवढेच नव्हे, तर आम्हाला कोणत्या बाबींवर मेहनत करावी लागणार आहे, याचाही अंदाज आला आहे, असे हरमनप्रीत स्पष्टपणे सांगते.

ऑस्ट्रेलियन संघ बलवान आहे, तसेच यंदाच्या टी-२० विश्‍वकरंडकात आतापर्यंत त्यांचा संघ एकदाही पराभूत झालेला नाही; तरीही या लढतीत दोन्ही संघांवर एकसारखाच दबाव असणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना खूप काही शिकायला मिळते. भविष्यात काय करायला हवे याची कल्पना येते. या लढतीत आम्ही अव्वल दर्जाचे क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करणार आहोत.

- हरमनप्रीत कौर, कर्णधार, भारत