IND vs ENG : बेअरस्टोची शतकी झुंज!

पाचवी कसोटी : इंग्लंडच्या २८४ धावा; भारताकडे १९८ धावांची आघाडी
ind vs eng 5th test match scorecard hundred by jonny bairstow
ind vs eng 5th test match scorecard hundred by jonny bairstowsakal

बर्मिंगहॅम : काट्याने काटा काढायचे तंत्र वापरत जॉनी बेअरस्टोने अफलातून आक्रमक शतक ठोकून इंग्लंड संघाला अडचणीतून बाहेर काढले. तिसऱ्या दिवसाच्या खेळात बेअरस्टोने जोखीम पत्करून आक्रमक खेळ केला. भारतीय गोलंदाजांनी त्याला अनेक प्रश्न विचारले आणि तो बऱ्याच वेळा चकला, पण विकेटवर खंबीर उभा राहिला. बेअरस्टोने केलेल्या घणाघाती शतकी (१०६ धावा) खेळीनेच इंग्लंडला पहिल्या डावात २८४ धावा उभारता आल्या. १९८ धावांची चांगली आघाडी भारताच्या हाती लागली ती गोलंदाजांनी हार न मानता केलेल्या प्रयत्नांमुळेच. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा भारताने २ बाद ६७ धावा केल्या होत्या.

एजबास्टन मैदानावर बसून मी क्रिकेटचा बॉलीवूड सिनेमा बघत होतो. हिंदी सिनेमातील हिरोला समोरून कितीही गोळ्या मारल्या तरी एकही लागत नाही. उलटपक्षी हिरो ६ गोळ्यांच्या रिव्हॉल्वरमधून १० जणांना मारतो आणि त्याचा नेम एकदाही चुकत नाही. तिसऱ्या दिवसाचा खेळ चालू झाल्यावर अगदी तसेच मला सामना बघताना जाणवत होते. महम्मद शमीला खेळताना बेअरस्टो अनेक वेळा चकला, पण एकदाही चेंडूने बॅटची कड घेतली नाही. दुसऱ्या बाजूला बेअरस्टोने धोका पत्करून मारलेले सगळे फटके अचूक लागले. इंग्लंड संघ अडचणीत सापडला असताना बेअरस्टोने अफलातून आक्रमक शतक झळकावले.

सकाळच्या सत्रात अनेक वेळा बेअरस्टो आणि कप्तान बेन स्टोक्स खेळताना चुकले. चेंडू बॅटची कड काही केल्या घेत नाही, म्हणून भारतीय खेळाडू निराश झाले. बेअरस्टो आणि विराट कोहलीची बोलाचाली झाली. महम्मद शमीच्या कमनशिबाचा राग भारतीय खेळाडूंना आला. बोलाचाली अगोदर बेअरस्टोचा स्ट्राईकरेट २१ होता जो नंतर १५० झाला... अगोदर तो पुजारा होता, कोहलीने बोलून त्याचा रिषभ पंत केला, या शब्दांत विरेंदर सेहवागने ट्विट केले. थोडा जम बसल्यावर धाडस करून बेअरस्टो मोठे फटके मारत राहिला आणि धावफलक वेगाने पळू लागला. त्यातून बेन स्टोक्सचे दोन झेल सुटल्याने चांगलीच भारतीय पाठीराख्यांची चिडचिड झाली. ज्या बुमराने सोपा झेल सोडला, त्याच बुमराने शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर बेन स्टोक्सचा झेल डावीकडे पळत सूर मारत घेतला. स्टोक्सने २५ धावा केल्या.

उपाहारानंतर खेळ चालू झाल्यावर जॉनी बेअरस्टोने गेल्या ८ कसोटी सामन्यांतील आपले पाचवे शतक १४ चौकार आणि २ षटकारांसह साजरे केले. प्रेक्षकांबरोबर त्याच्याशी बोलाचाली करणाऱ्या कोहलीनेही टाळ्या वाजवून त्याचे अभिनंदन केले. बुमराने शमीला पहिल्यांदाच समोरच्या बाजूने गोलंदाजीला आणले आणि नशीब फिरले. पहिल्याच चेंडूवर बेअरस्टोने मोठा फटका मारायचा प्रयत्न फसला आणि कोहलीने झेल बरोबर पकडला.

संक्षिप्त धावफलक ः भारत पहिला डाव- सर्व बाद ४१६ धावा आणि दुसरा डाव : २ बाद ६७ धावा (अखेरचे वृत्त हाती येईपर्यंत) वि. इंग्लंड पहिला डाव सर्व बाद २८४ धावा (जो रुट ३१, जॉनी बेअरस्टो १०६ - १४० चेंडू, १४ चौकार, २ षटकार, बेन स्टोक्स २५, सॅम बिलींग्स ३६, जसप्रीत बुमरा ३/६८).

फलंदाजांचा धडाका

गेल्या काही महिन्यांत जॉनी बेअरस्टोने कसोटी क्रिकेटची लोकप्रियता उंचावली आहे. परिस्थिती काहीही असली तरी बेअरस्टो आक्रमक फटकेबाजी करायला घाबरत नाही. सध्या त्याची लय इतकी चांगली आहे की कोणीही गोलंदाज त्याला बाद करू शकत नाही. नुकत्याच संपलेल्या न्यूझीलंड समोरच्या तीन कसोटी सामन्यांत बेअरस्टोने १३६, १६२, नाबाद ७१ आणि चालू सामन्यात शतक ठोकले आहे. दरवेळी त्याचा स्ट्राईक रेट १००चा राहिला आहे. बेअरस्टोची सध्याची लय नशीब आणि धावांचा शतकांचा धडाका बघून स्लिपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीला वाटत असेल की क्रिकेट देव बेअरस्टोवर इतका खूश आणि माझ्यावर इतका नाराज का आहे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com