IND vs ENG : रोहित शर्मा - शुभमनची शतके; अडीचशे धावांच्या आघाडीसह भारताची सामन्यावर मजबूत पकड

पहिल्या दिवशी इंग्लंडचा डाव ५७ षटकांत २१८ धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारतीय फलंदाजांनी १२० षटके फलंदाजी करून आठ बाद ४७३ धावा उभारल्या.
ind vs eng rohit sharma shubman gill century fifth test match dharmshala
ind vs eng rohit sharma shubman gill century fifth test match dharmshala

धरमशाला: कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शानदार शतके करत केलेली १७१ धावांची भागीदारी त्यानंतर सर्फराझ खान व देवदत्त पडिक्कल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यावरची पकड अधिक घट्ट करताना २५५ धावांची आघाडी घेतली आहे.

पहिल्या दिवशी इंग्लंडचा डाव ५७ षटकांत २१८ धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारतीय फलंदाजांनी १२० षटके फलंदाजी करून आठ बाद ४७३ धावा उभारल्या. यावरून धरमशालाची खेळपट्टी फलंदाजीस उत्तम असल्याचे दाखवून दिले; परंतु त्याचवेळी इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांनी मिळून सहा विकेट मिळवलेल्या असल्यामुळे त्यांच्या फलंदाजांसाठी दुसरा डाव सोपा नसेल याचेही संकेत मिळाले आहेत.

सामन्यात पुनरागमन करायला इंग्लंड संघाला दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू झाल्यावर किमान एक- दोन फलंदाजांना लवकर बाद करणे गरजेचे होते. दुसऱ्या बाजूला भारतीय संघाला सामन्याची पकड अजून मजबूत करायला मोठ्या भागीदारीची गरज होती. रोहित शर्मा आणि शुभमन गिलने अत्यंत पद्धतशीरपणे भागीदारी रचताना इंग्लंडच्या सामन्यात परत येण्याच्या आशा धुळीस मिळवल्या.

दोघा तरबेज फलंदाजांनी सुरुवातीला जम बसवायला थोडा अवधी घेऊन मग आक्रमक फटके लीलया मारले. रोहित शर्मापेक्षा शुभमन गिलने जास्त विश्वासाने फलंदाजी केली. मैदानातील मोकळ्या जागेतून त्याने फटके मारताना दाखवलेली ताकद मस्त होती.

एक काळ तर असा होता की, बेन स्टोक्सने डाव्या बाजूला सहा क्षेत्ररक्षक उभे करून आखूड टप्प्याचा मारा करून बघितला. पहिल्या दोन तासांच्या खेळात एकही विकेट न गमावता रोहित- शुभमनने १३० पेक्षा जास्त धावा जोडल्या. उपहाराअगोदर दोघांची शतके पार पडली होती.

उपहारानंतर जवळपास आठ महिन्यांनंतर बेन स्टोक्सने गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. लक्षणीय बाब अशी की, इतक्या मोठ्या कालखंडानंतर गोलंदाजीला आल्यावर बेन स्टोक्सच्या पहिल्याच चेंडूवर १०३ धावांवर खेळणारा रोहित शर्मा बाद झाला. पाठोपाठ शतकवीर शुभमन गिलला अँडरसनने त्रिफाळाचीत केले.

पदार्पण करणाऱ्या पडीक्कलने सर्फराझ खानसोबत ९७ धावा जोडताना दाखवलेली समज चांगली वाटली. ८० षटकांनंतर लगेच इंग्लंडने दुसरा नवा चेंडू घेतला. पडीक्कल- सर्फराझ जोडीने त्याचा धीराने सामना केला. फिरकीला सहजी खेळणाऱ्या सर्फराझने मग ठेवणीतले फटके प्रेक्षकांना सादर केले. दोघांनी मोठ्या झोकात अर्धशतकी मजल मारली.

चहापानानंतर पडीक्कल- सर्फराझ जोडी लगेच तंबूत परतली. भारताचे पाच फलंदाज बाद करण्यात इंग्लंडच्या फिरकीला यश मिळाले, ज्यात बशीरचे तीन तर हार्टलीचे दोन बळी होते. कधी नव्हे ते फलंदाजीची संधी तीसुद्धा दडपण नसताना करायला मिळाल्याचा थोडा फायदा जसप्रीत बुमराने खेळून घेतला. बुमरा - कुलदीप यादवने तब्बल १८ षटके तग धरून इंग्लंड संघाची परीक्षा बघितली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com