IND vs NZ: 7 संधी वाया! पंतच्या अनुपस्थितीचा फायदा उचलण्यास अपयशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs NZ 1st t20i Ishan Kishan

IND vs NZ: 7 संधी वाया! पंतच्या अनुपस्थितीचा फायदा उचलण्यास अपयशी

IND vs NZ 1st t20i Ishan Kishan : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने शुक्रवारी रात्री न्यूझीलंडविरुद्ध पुन्हा एकदा सर्वांची निराशा केली. रांचीच्या त्याच्या घरच्या मैदानावर किशन मोठ्या खेळीने चाहत्यांचे मनोरंजन करेल अशी अपेक्षा होती, पण यावेळीही तो चुकला.

ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत इशान किशनला सतत संधी मिळत आहे, ज्याचा तो अद्याप फायदा घेऊ शकलेला नाही. हे असच सुरू राहिल तर तो लवकरच संघातून बाहेर जाऊ शकतो. ऋषभ पंत कार अपघातात जखमी झाला त्यामुळे तो क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्या अनुपस्थितीत इशान किशन आणि संजू सॅमसनसारख्या यष्टीरक्षक फलंदाजांना आपली प्रतिभा दाखवण्याची प्रत्येक संधी आहे.

इशान किशन बांगलादेश दौऱ्यावर द्विशतक झळकावून नक्कीच चर्चेत आला, पण या खेळीनंतर त्याची कामगिरी काही विशेष झाली नाही. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याला फक्त 37, 2 आणि 1 धावा करता आल्या. त्याचवेळी केएल राहुल संघात असताना त्याला एकदिवसीय मालिका खेळण्याची संधी मिळाली नाही.

जेव्हा केएल राहुलला त्याच्या लग्नामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून ब्रेक देण्यात आला होता, तेव्हा इशान किशनलाही त्याचा फायदा घेता आला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याने 5, 8* आणि 17 धावा केल्या. या मालिकेत किशनला सलामीवीर म्हणून नव्हे तर मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळण्याची संधी मिळाली, पण त्याचाही फायदा उठवता आला नाही.

त्याचवेळी किवी संघाविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये तो स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. इशान किशनने यावर्षी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये 7 डाव वाया घालवले आहेत. या 7 डावात त्याच्या बॅटमधून फक्त 74 धावा निघाल्या आहेत.

अशा स्थितीत आता इशान किशनकडे फारशा संधी उरल्या नसल्याचे दिसून येत आहे. केएल राहुल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय संघात पुनरागमन करणार आहे. आगामी दोन टी-20 सामन्यांमध्येही किशन अपयशी ठरल्यास, टीम इंडिया मर्यादित षटकांमध्ये केएल राहुल आणि कसोटी क्रिकेटमध्ये केएस भरत यांच्यासोबत पुढे जाऊ शकते.