IND VS NZ : रहाणे फॉर्मात येईल : पुजारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND VS NZ

IND VS NZ : रहाणे फॉर्मात येईल : पुजारा

कानपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेचा फॉर्म सध्या चांगला नसला तरी तो गुणवान खेळाडू आहे आणि लवकरच जोरदार पुनरागमन करेल, असा विश्वास भारतीय संघाचा उपकर्णधार चेतेश्वर पुजाराने व्यक्त केला. प्रत्येक जण अशा कठीण काळातून जात असतो असेही तो म्हणाला.

स्वतःकडे असलेल्या उपकर्णधारपदाच्या जबाबदारीबाबत बोलताना पुजारा म्हणाला, ही नवी जबाबदारी आहे ज्याचा अभिमान आहे मला. माझ्याकडे असलेला अनुभव मी नवीन खेळाडूंना देणार आहे. आता कसोटी अजिंक्यपदाचे नवे सत्र सुरू होत आहे आणि त्याकडे लक्ष देऊन खेळायला हवे.

हेही वाचा: नागपूर : शिष्यवृत्ती हजाराची खर्च बाराशे रुपयाचा

इंग्लंड मालिकेतील शेवटच्या दोन कसोटीत पुजारा जरा आक्रमक फलंदाजी करताना दिसला, त्याबद्दल तुझ्या खेळात बदल केला होतास का असे विचारता पुजारा म्हणाला, थोडा विचार वेगळा होता फलंदाजी करताना इतकेच. थोडा मोकळेपणे खेळलो, आता भारतात खेळायचा आनंद घेणार आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना पुजाराने पुढे म्हटले, की तुमच्या मनात नील वॅगनरच्या गोलंदाजीबद्दल प्रश्न असतील. नील वॅगनर वेगळा मारा करतो त्याकरता आमची वेगळी तयारी चालू आहे... भारतात त्याच्या माऱ्यात किती धार असेल बघूयात कारण ग्रीन पार्क कानपूरची खेळपट्टी थोडी संथ असते आणि त्यावर उसळीही कमी असते.

न्यूझीलंडला फिरकीची भीती असणार

भारतीय संघ फिरकीचे बलस्थान पकडून खेळणार, असे सांगताना पुजारा म्हणाला, फिरकीची भीती किवींना असणार. आम्हाला त्याचा थोडा फायदा नक्की आहे, पण ते फिरकीला चांगले खेळतात. त्यांच्या संघात रॉस टेलर आणि विल्यमसनसारखे फिरकीला चांगले खेळणारे अनुभवी फलंदाज आहेत. चांगली विश्रांती घेऊन ताजे होऊन परत येताना आत्मविश्वास वाढलेला आहे. दोन कसोटींचा नव्हे, तर संपूर्ण मोसमाचा विचार मी करतो आहे. मधल्या काळात मी सराव करत होतो, तसेच फिटनेस आणि आराम याचा समन्वय साधला आहे. म्हणून मनातून ताजेपणा जाणवतोय. त्यातून नवीन प्रशिक्षक राहुल द्रविडबरोबर सगळ्यांनी कुठे ना कुठे काम केले आहे. मी तर खेळलो आहे त्याचाही फायदा होईल, असे पुजाराने सांगितले.

loading image
go to top