IND VS NZ T-20 : भारताचे लक्ष्य मालिका विजयाचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs NZ

IND VS NZ T-20 : भारताचे लक्ष्य मालिका विजयाचे

रांची : प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांच्या पर्वाला जयपूरमध्ये मोठ्या दिमखात सुरुवात झाली. पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीमध्ये विजय मिळवल्यानंतर आता भारताचा संघ उद्या रांची येथे होणाऱ्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० लढतीत विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल. केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत टीम साऊथीच्या नेतृत्वात मैदानात उतरणाऱ्या न्यूझीलंडच्या संघाची उद्या परीक्षा असेल. ट्वेन्टी-२० मालिकेतील आव्हान कायम राखून मालिका १-१ अशी बरोबरी ठेवण्यासाठी पाहुणा संघ जीवाचे रान करताना दिसेल.

न्यूझीलंडकडून मिळालेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताच्या पहिल्या तीन फलंदाजांनी अपेक्षेला अनुसरून कामगिरी केली. लोकेश राहुल, रोहित शर्मा या सलामी जोडीने भारताला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर रोहित शर्माने सूर्यकुमार यादवसोबत महत्त्वपूर्ण भागीदारीही रचत भारताला विजयासमीप नेले. गेली अनेक वर्षे सातत्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा विराट कोहली या मालिकेत खेळत नाही; पण सूर्यकुमार यादवने ६२ धावांची धडाकेबाज खेळी साकारत त्याची उणीव भासू दिली नाही. मात्र श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर व रिषभ पंत या मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश व चाचपडत खेळणे ही भारतासाठी डोकेदुखी ठरली. रांची येथील दुसऱ्या लढतीत भारतीय संघ मधल्या फळीतील फलंदाजांवर मेहनत घेताना दिसेल.

भुवी, अश्‍विनचा अनुभव मदतीला

भुवनेश्‍वरकुमारला ट्वेन्टी-२० विश्‍वकरंडकात सूर गवसला नाही; पण राहुल द्रविड व रोहित शर्मा या दोघांनीही त्याच्यावर विश्‍वास दाखवला व पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीत त्याला अंतिम अकरामध्ये स्थान दिले. भुवनेश्‍वरकुमार याने २४ धावा देत दोन फलंदाजांना बाद करीत दोघांचाही विश्‍वास सार्थ ठरवला. रविचंद्रन अश्‍विन यानेही २३ धावा देत दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. दोघांचा अनुभव या वेळी भारताच्या मदतीला धावून आला. या दोघांव्यतिरिक्त दीपक चहर, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल यांना आपला ठसा उमटवता आला नाही. तसेच मोहम्मद सिराज यालाही लढतीदरम्यान दुखापत झाली.

…तर राखीव खेळाडूंना संधी

ऑस्ट्रेलियामध्ये २०२२ सालामध्ये ट्वेन्टी-२० विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची तयारी आतापासूनच सुरू करावी लागणार आहे. त्यामुळे उद्याच्या लढतीत भारतीय संघ जिंकल्यास तिसऱ्या लढतीत राखीव खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. ॠतुराज गायकवाड, अवेश खान, इशान किशन, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल यांना पहिल्या लढतीत संधी दिली नाही. दुसऱ्या लढतीत यांच्यापैकी कोणाला संधी देण्यात येते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

दवामुळे नाणेफेक महत्त्वाची ठरणार

रांची येथील दुसऱ्या ट्वेन्टी-२० लढतीतदरम्यान दव पडणार असल्याचे समजते. त्यामुळे नाणेफेकीचा कौल या लढतीत महत्त्वाचा ठरणार आहे. टीम साऊथीच्या न्यूझीलंड संघासाठी उद्याची लढत महत्त्वाची आहे. भारतीय फलंदाजांना पॉवरप्लेमध्ये अधिक धावा काढू न देण्यासाठी न्यूझीलंडच्या गोलंदाजी विभागात बदल होऊ शकतो.

ठिकाण - रांची , वेळ - संध्याकाळी ७ वाजता , प्रक्षेपण - स्टार स्पोर्टस्

loading image
go to top