
IND vs SL Asia Cup Final : वर्ल्डकपची तयारी म्हणून नव्हे तर दोन पेक्षा जास्त देश खेळत असलेल्या स्पर्धेचे विजेतेपद भारतीय संघासाठी अत्यावश्यक आहे. २०१८ नंतर भारताने आयसीसीची तर सोडाच, आशिया कप स्पर्धा जिंकलेली नाही. म्हणून या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आजचा श्रीलंकेविरुद्धचा सामना भारतासाठी महत्वाचा ठरलो.
भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू आणि सगळे प्रशिक्षक एक गोष्ट चांगली जाणून आहेत की आता परतीच्या वाटा बंद झाल्या आहेत. रविवारच्या सामन्यातला विजय हीच प्रगतीची वाट ठरणार आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांना दिलासा देणार. म्हणूनच भारतीय संघ संपूर्ण ताकदीनिशी श्रीलंकन संघाला भिडायला प्रेमदासा मैदानावर उतरायच्या तयारीत आहे.
श्रीलंका संघ एका अर्थाने तो काहीसा यजमान संघ आहे. आणि दुसरे म्हणजे चार प्रमुख खेळाडू संघात नसून हार न मानणारा आहे. या स्पर्धेत अफगाणिस्तान आणि बांगलादेश संघाने श्रीलंकेला जोरदार टक्कर दिली. अगदी पराभवाची भितीही दाखवली. त्याला उत्तर देताना त्यांनी विजय तर मिळवलेच. वर पाकिस्तान संघाला निर्णायक सामन्यात पराभूत करून अंतिम फेरी गाठून दाखवली आहे. साहजिकच भारतीय संघाला पूर्ण कल्पना आहे की पूर्ण ताकदीनिशी केलेला सर्वोत्तम खेळच रविवारी विजयाचा मार्ग दाखवू शकतो.
अंतिम सामन्यात भारतीय संघ आपला अव्वल संघ मैदानात उतरवेल यात शंका नाही. म्हणजेच कदाचित तंदुरुस्त होऊन परतलेला श्रेयस अय्यर संघात परतून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. शमी आणि सिराजपैकी एक वेगवान गोलंदाज बुमराला साथ देईल. प्रेमदासाच्या खेळपट्टीचा अंदाज घेता आणि गेल्या काही सामन्यातील चित्रं बघता अक्षर पटेल संघातील आपली जागा राखू शकला असता परंतु त्याच्या हाताला दुखापत झाली विश्वकरंडक स्पर्धा तोंडावर आलेली असताना अक्षरला खेळवण्याचा धोका स्वीकारला जाणार नाही.
श्रीलंकन संघाने पाकिस्तानला पराभूत करताना केलेली फलंदाजी लक्षणीय होती. कुसल मेंडीस, सदीरा आणि असलंकाने दाखवलेली प्रगल्भता डोळ्यात भरणारी होती. भारतीय गोलंदाजांना त्याच तरुण गुणवान श्रीलंकन फलंदाजांना रोखण्याची कमाल करून दाखवावी लागणार आहे. जर यातील काही प्रमुख फलंदाजांना बाद करता आले तरच श्रीलंकन संघावरचे दडपण वाढणार आहे. थोडक्यात नवीन चेंडूवरचा मारा धावा रोखण्यासाठी नव्हे तर फलंदाजांना बाद करायच्या उद्देशाने करावा लागेल.
संयोजकांना जाग आल्याने गेल्या काही सामन्यांसाठी तिकिटाचे दर खूप कमी करण्यात आले. ठरवलेले दर नेहमीच्या श्रीलंकन सामन्यांच्या दरापेक्षा किंचित जास्त असले तरी आपला संघ अंतिम सामन्यात धडक मारून आला आहे म्हणल्यावर श्रीलंकन प्रेक्षक रविवारी प्रेमदासा मैदानावर सामना बघायला गर्दी करतील यात शंका नाही. श्रीलंकेत काही लोक आपापला बँड घेऊन सामना बघायला येतात आणि संपूर्ण सामन्यात वाद्य वाजवत नाचत गात सामन्याचा आनंद घेतात. रविवारी भारत वि श्रीलंका सामन्यासाठी असेच काहीसे क्रिकेटच्या मोठ्या सणाचे वातावरण असेल.
संघ यातून निवडणार ः
भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन / श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर / शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
श्रीलंका ः पाथून निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडीस, सदारी समराविक्रमा, चरिथ असलांका, धनंजय डिसिल्वा, दासून शनाका (कर्णधार), दुनित वेल्लालागे, प्रमोद मदुशान/ दासून हेमांथा, कुसल रजिता, महीषा पथिराना
भारत-श्रीलंका अंतिम सामना वेळ ः दुपारी ३ पासून
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्टस, हॉटस्टार
हवामानाचा अंदाज ः वादळी पावसाच्या काही सरी अपेक्षित. सोमवारी राखीव दिवस असला तरी रविवारी पावसाचा व्यत्यय आल्यास षटके कमी होण्याची शक्यता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.