
Commonwealth Games 2022 : या खेळांमध्ये पदकाची आशा
मुंबई : ऑलिंपिक या जगातील नंबर वन क्रीडा महोत्सवात भारतीय खेळाडूंना अद्याप लक्षवेधक पदकांची लयलूट करता आली नसली तरी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये मात्र भारतीयांनी आपला ठसा उमटवला आहे. याच पार्श्वभूमीवर आता बर्मिंगहॅम येथे उद्यापासून सुरू होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीयांकडून पदकांवर मोहोर उमटवण्याच्या आशा बाळगल्या जात आहेत. मात्र हमखास पदक मिळण्याची शाश्वती असलेला नेमबाजी हा खेळ यंदाच्या क्रीडा महोत्सवातून वगळण्यात आल्यामुळे भारतीयांच्या अभियानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यानंतरही भारतीय खेळाडू पदकांवर अचूक नेम साधतील आणि देशाचा झेंडा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखात फडकवतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही.
२०१८ गोल्ड कोस्ट येथे राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण ६६ पदकांवर नाव कोरले होते. यामध्ये २६ सुवर्णपदक, २० रौप्यपदक व २० ब्राँझ पदकांचा समावेश होता. नेमबाजी या खेळामध्ये भारताला सर्वाधिक १६ पदके मिळाली होती. एकूण पदकांवर नजर टाकता नेमबाजी या खेळातील पदकांची टक्केवारी २५ इतकी होते. नेमबाजी सर्वाधिक ७ सुवर्णपदके जिंकण्यातही भारताने यश संपादन केले होते. यंदा नेमबाजी नसल्यामुळे भारताला बॅडमिंटन, कुस्ती, वेटलिफ्टिंग, हॉकी, क्रिकेट, टेबल टेनिस, ॲथलेटिक्स या खेळांवर जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे.
सिंधूचे लक्ष्य सुवर्णपदकाचे
पी. व्ही. सिंधूने आतापर्यंतच्या कारकीर्दीत जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. पण तिला ऑलिंपिक, आशियाई व राष्ट्रकुल या तीन महत्त्वाच्या स्पर्धांमधील महिला एकेरीच्या गटात सुवर्णपदक जिंकता आलेले नाही. यावेळी ती सुवर्णपदक साधण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करील. याचसह किदांबी श्रीकांत व लक्ष्य सेन या बॅडमिंटनपटूंनाही सुवर्णपदकाचे वेध लागले असतील.
हॉकी व क्रिकेटमध्येही आशा
हॉकी या खेळामध्ये भारताचे दोन्ही संघ सहभागी झाले आहेत. टोकियो ऑलिंपिकमधील दमदार कामगिरीनंतर भारताच्या पुरुष व महिला या दोन्ही संघांकडून मोठ्या अपेक्षा बाळगल्या जात आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांनी पदक जिंकल्यास आश्चर्य वाटणार नाही. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये पहिल्यांदाच महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य देशाला या स्पर्धामध्ये सुवर्णपदकासाठी प्रबळ दावेदार समजले जात असले तरी हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघाकडूनही पदक जिंकण्याच्या आशा आहेत.
बॉक्सिंग अन् टेटेपटू पदकांची संख्या वाढवणार
मेरी कोम व विजेंदर सिंग या दोघांच्या अव्वल दर्जाच्या कामगिरीनंतर भारतामध्ये बॉक्सिंगचे वारे सुसाट वाहू लागले. यंदाच्या स्पर्धांमध्येही या खेळामधून भारताला पदक मिळतील ही आशा आहे. अमित पांघल, शिव थापा, लोवलीना बोर्गोहेन, निखत झरीन हे खेळाडू बॉक्सिंगचे रिंगण गाजवू शकतील. या खेळासह भारतीय टेबल टेनिसपटूही प्रतिस्पर्ध्यांना हरवण्याची क्षमता बाळगत आहेत. शरथ कमल, मनिका बत्रा हे टेटेपटू भारताची पदकांची संख्या वाढवतील यात शंका नाही.
या खेळाडूंकडून पदक जिंकण्याच्या अपेक्षा
अविनाश साबळे (३ हजार व ५ हजार मीटर अडथळा शर्यत)
हिमा दास (२०० मीटर धावण्याची शर्यत)
लक्ष्य सेन, पी. व्ही. सिंधू, किदाम्बी श्रीकांत (बॅडमिंटन)
अमित पांघल, शिव थापा, लोवलीना बोर्गोहेन, निखत झरीन (बॉक्सिंग)
भारतीय महिला संघ (क्रिकेट)
एसो ॲल्बेन, रोनाल्डो एल. (सायकलिंग)
प्रणती नायक (जिम्नॅस्टीक्स)
भारतीय पुरुष व महिला संघ (हॉकी)
दीपिका पल्लीकल, जोश्ना चिनप्पा (स्क्वॉश)
शरथ कमल, मनिका बत्रा (टेबल टेनिस)
मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग)
बजरंग पुनिया, रवी दहीया, दीपक पुनिया (कुस्ती)
विनेश फोगाट, अंशू मलिक, साक्षी मलिक, दिव्या काकरन (कुस्ती)
Web Title: India At Commonwealth Games 2022 List Of Players Pv Sindhu Hima Das Womens Cricket Team
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..