कोहलीसेना पिछाडीवर; आता ऑस्ट्रेलियासमोर जिंकण्याचे आव्हान

India to face upbeat Australia in second ODI
India to face upbeat Australia in second ODI

अ‍ॅडलेड : यजमान ऑस्ट्रेलियन संघाने सिडनीला झालेला पहिला एक दिवसीय सामना जिंकून विराट कोहलीला जणू आव्हान दिले आहे. मालिका 3 सामन्यांचीच असल्याने अ‍ॅडलेडला होणारा दुसरा सामना जिंकण्याचे काहीसे दडपण भारतीय संघावर आहे. रवींद्र जडेजाला एक दिवसीय क्रिकेटमधे खरे जोराचे पुनरागमन करता येते का आणि मधल्या फळीतील फलंदाज काय खेळी उभारतात या दोन गोष्टींकडे प्रामुख्याने अ‍ॅडलेड सामन्यात लक्ष असणार आहे.

भारतीय संघापेक्षा कागदावर अनुभवाने कमजोर दिसणार्‍या ऑस्ट्रेलियन संघाने सिडनी सामन्यात परिपूर्ण क्रिकेट खेळून दाखवले. तीन फलंदाजांनी अर्धशतके केल्याने मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले तिथेच यशाचा मार्ग यजमान संघाला सापडू लागला. झेल पकडण्यात कौशल्य दाखवणार्‍या भारतीय खेळाडूंचे मोठ्या मैदानावरचे क्षेत्ररक्षण दर्जेदार नव्हते. बर्‍याच वेळा चेंडू व्यवस्थित न पकडल्याने किंवा जोरदार चेंडू फेका न आल्याने एकच्या जागी दोन किंवा दोनच्या जागी तीन धावा ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी पळून काढल्या. दुसर्‍या सामन्यात यश मिळवायचे झाल्यास क्षेत्ररक्षणात सुधारणा गरजेची वाटते. 

पहिल्या सामन्यात रोहित शर्माने अफलातून शतकी खेळी करूनही अपेक्षित धावसंख्येचा पाठलाग करता आला नाही. दुसर्‍या सामन्यात अंबाती रायुडू , धोनी आणि संधी दिली गेल्यास दिनेश कार्तिकवर संघ व्यवस्थापन बारीक नजर ठेवून असेल. 4-5-6 क्रमांकावर खेळणारे हे तीन फलंदाज संघाकरता कशी कामगिरी करतात यावर बरेच काही अवलंबून असेल.

सुरुवातीला पटापट फलंदाज बाद झाले तर दडपणाखाली धोनी चांगला धीर देतो हे मान्य केले तरी खेळी उभारताना धोनी बरेच चेंडू घेतो या कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शुभमन गिल सध्याच्या घडीला भारतीय सर्वात गुणवान तरुण फलंदाज समजला जातो. शुभमन गिल संघात दाखल होत असल्याने संघ व्यवस्थापन त्याला संधी कधी देते हे सुद्धा बघणे उत्सुकतेचे आहे.

ऑस्ट्रेलियन संघातील ज्या तरुण खेळाडूंनी पहिल्या सामन्यात छाप पाडली त्यात अलेक्स केरी आणि जे रिचर्डसन यांची नावे पुढे आली. मालिकेत चांगली सुरुवात केली गेली असल्याने ऑस्ट्रेलियन संघात बदल केले जाण्याची शक्यता कमी वाटते. भारतीय संघ व्यवस्थापन दुसर्‍या सामन्याकरता एखादा बदल करायची शक्यता नाकारता येत नाही. अ‍ॅडलेड मैदानावरची खेळपट्टी कडक उन्हामुळे टणक असेल आणि फलंदाजांना साथ देईल असे वाटते. दुसर्‍या सामन्यात नाणेफेक जिंकणारा कप्तान फलंदाजी करायचा निर्णय घेईल असे वाटते. दुसरा सामना कामाच्या दिवशी होणार असल्याने अजून तिकिटांची चटणी उडालेली नाही. मैदान प्रेक्षकांनी भरायला संयोजकांचा भरवसा ऑस्ट्रेलियन पाठीराख्यांपेक्षा भारतीय फॅन्सवर जास्त आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com