भारत-पाक लढतीचे भीजत घोंगडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

भारत आणि पाकिस्तान यांच्यात डेव्हिस करंडक सांघिक टेनिस स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीचा निर्णय लांबणीवर पडला आहे. या संदर्भात होणारी भारतीय टेनिस संघटना आणि आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ यांच्यातील बैठक एका दिवसाने लांबणीवर टाकण्यात आली आहे. 

मुंबई / नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात डेव्हिस करंडक सांघिक टेनिस स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीचा निर्णय लांबणीवर पडला आहे. या संदर्भात होणारी भारतीय टेनिस संघटना आणि आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ यांच्यातील बैठक एका दिवसाने लांबणीवर टाकण्यात आली आहे. 

आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाची सुरक्षा समिती भारतीय टेनिस संघटना पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार असल्याचे संकेत मिळत होते. मात्र त्यापूर्वी आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा होणार आहे. आता ही बैठकही भारतासाठी महत्त्वाची आहे. भारताचे अनिल खन्ना आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाचे उपाध्यक्ष आहेत. मात्र महासंघाची निवडणूक काही महिन्यांवर आली असल्यामुळे खन्ना याबाबत थेट भूमिका घेण्याची शक्‍यता कमी आहे, असेही काही अभ्यासकांचे मत आहे. 

आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या सुरक्षा पथकाने पाकिस्तानातील सुरक्षेचा आढावा घेतला होता. पण भारताने घटनेतून 370 कलम रद्द केल्यानंतर परिस्थितीत खूप बदल झाला असल्याचा भारताचा दावा आहे. लढत लांबणीवर टाकण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यावर भारतीय टेनिस संघटना त्रयस्थ ठिकाणच्या लढतीसाठी आग्रही आहे. 
आज संध्याकाळी भारतीय संघटना आणि आयटीएफ यांच्यात बैठक होणार होती. त्यात कर्णधार महेश भूपतीही सहभागी होणार होते. भूपती यांनी ही बैठक आयटीएफने उद्यापर्यंत लांबणीवर टाकली असल्याचे सांगितले. त्यांनी कोणत्याही प्रश्नास उत्तर दिले नाही. 

बैठकीच्या वेळेवरूनच वाद सुरू 
आयटीएफने मंगळवारी होणारी बैठक भारतीय वेळेनुसार 7 वाजता होणार असल्याचे कळवले; मात्र भारतीय टेनिस संघटनेला ही वेळ लवकर हवी आहे. त्यांनी ही बैठक लवकर घ्यावी असे आयटीएफला सांगितल्याचे समजते, पण आयटीएफने याबाबत कोणतेही उत्तर पाठवलेले नाही, त्यामुळे ही बैठक होणार का याबाबतही प्रश्‍नचिन्ह आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india pakistan davis cup match decision still awaited