सुरक्षा तपासणीनंतरच भारत-पाक लढतीचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 September 2019

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सप्टेंबरच्या मध्यास होणारी डेव्हीस करंडक टेनिस स्पर्धेतील लढत आता नोव्हेंबरच्या अखेरीस होईल. ही लढत इस्लामाबादलाच होईल, मात्र त्याबाबतचा अंतिम निर्णय नोव्हेंबरच्या सुरुवातीस घेतल्या जाणाऱ्या सुरक्षा तपासणीनंतरच होईल. 

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सप्टेंबरच्या मध्यास होणारी डेव्हीस करंडक टेनिस स्पर्धेतील लढत आता नोव्हेंबरच्या अखेरीस होईल. ही लढत इस्लामाबादलाच होईल, मात्र त्याबाबतचा अंतिम निर्णय नोव्हेंबरच्या सुरुवातीस घेतल्या जाणाऱ्या सुरक्षा तपासणीनंतरच होईल. 

भारत वि. पाकिस्तान ही डेव्हीस करंडक स्पर्धेतील लढत 29 -30 नोव्हेंबर किंवा 30 नोव्हेंबर - 1 डिसेंबरला इस्लामाबादमध्ये होईल. या लढतीच्या सुरक्षेचा आढावा 4 नोव्हेंबरला घेण्यात येईल. त्यानंतर लढत इस्लामाबादला होणार की त्रयस्थ ठिकाणी, याबाबतचा निर्णय होईल, असे भारतीय टेनिस संघटनेने कळवले आहे. 

आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने 14-15 सप्टेंबरला पाकिस्तानात होणारी ही लढत लांबणीवर टाकण्याचा निर्णय ऑगस्टमध्ये घेतला होता. भारत आणि पाकिस्तानातील तणाव वाढलेला असल्याने लढत लांबणीवर टाकण्याची अथवा त्रयस्थ ठिकाणी लढत खेळवण्याची मागणी भारताकडून झाली होती. 

आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाचा हा निर्णय खूपच विचारपूर्वक आहे. महासंघाची निवडणूक 27 सप्टेंबरला आहे. सध्या भारतीय संघटनेचे अनिल खन्ना आंतरराष्ट्रीय महासंघाचे उपाध्यक्ष आहेत. अर्थातच हे सर्व विचारात घेऊनच नोव्हेंबरच्या सुरुवातीस सुरक्षेचा आढावा घेऊन निर्णय विचारपूर्वक घेण्यात आला, असे मानले जात आहे. 

सुरक्षा आढाव्याचा आयटीएफकडून उल्लेख नाही 
भारतीय टेनिस संघटनेच्या पत्रकात 4 सप्टेंबरला भारत-पाक लढतीबाबत सुरक्षा आढावा घेतला जाईल, असे म्हटले आहे, पण आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या पत्रकात याचा उल्लेख नाही. त्यांनी पाकिस्तान 19 सप्टेंबरला लढतीच्या अंतिम तारखा ठरवेल, असे सांगतानाच आयटीएफ पाकमधील सुरक्षेचा आढावा घेत राहील, एवढेच सांगितले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india pakistan davis cup match dectsion of security report