नवी दिल्ली - आशिया-ओशियाना गट 1 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डेव्हिस करंडक लढत पाकिस्तानऐवजी अन्यत्र खेळविण्यात यावी, याविषयी आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या (आयटीएफ) पदाधिकाऱ्यांचे मन वळविण्याची संधी भारताला आज मिळणार आहे. उद्या सोमवारी आयटीएफच्या पदाधिकाऱ्यांशी टेली कॉन्फरन्सद्वारे भारतीय पदाधिकारी चर्चा करणार आहेत.
भारताने काश्मीरमधील 470 कलम रद्द केल्यानंतर भारत आणि पाक यांच्यातील राजकीय संबंध कमालीचे दुरावले आहेत. पाकिस्तानने भारताशी असलेले सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानात खेळणे सुरक्षित नाही, असे खेळाडूंचे म्हणणे असून, त्यांनी ही लढत त्रयस्थ केंद्रावर खेळवावी, अशी विनंती केली आहे. या चर्चेदरम्यान भारताची हीच बाजू मांडण्याची महत्त्वाची जबाबदारी कर्णधार महेश भूपती याच्यावर राहणार आहे.
राजकीय संबंध दुरावल्याचे दिसत असतानाही क्रीडा मंत्रालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. ही द्विपक्षीय मालिका नाही. आंतरराष्ट्रीय लढत असल्यामुळे आम्ही यात पडणार नाही, अशी भूमिका क्रीडा मंत्रालयाने घेतली होती. त्यानंतर "आयटीएफ' पदाधिकाऱ्यांनी हाच धागा पकडून भारतीय टेनिस संघटनेला लढत अन्यत्र हलविण्याची कारणे विचारली होती. पाकिस्तानातील सुरक्षा व्यवस्थेवरदेखील त्यांनी समाधान व्यक्त केले होते. त्यानंतरही भारतीय टेनिस संघटनेच्या आग्रहामुळे "आयटीएफ'ने चर्चा करण्याची तयारी दर्शविली होती. या चर्चेत पदाधिकाऱ्यांबरोबर कर्णधार महेश भूपती खेळाडूंचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार आहे.
|