INDvsSA : संथ फलंदाजीत भारताच्या पहिल्या दिवशी 3 बाद 273 धावा

ज्ञानेश भुरे
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

पावसाचा अंदाज केवळ अंदाज राहिला. पण, दिवस अखेर खेळ अपुऱ्या प्रकाशामुळेच थांबवावा लागला. खेळ थांबला तेव्हा कर्णधार विराट कोहली 63, तर अजिंक्य रहाणे 18 धावांवर खेळत होता. मयांक अगरवालने शानदार 108 धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून तीनही बळी कागिसो रबाडा याने मिळविले.

पुणे : तो येणार, कोसळणार अशी नुसती आवईच उठली. प्रत्यक्षात गहुंजेच्या मैदानावर पाऊस नाही पण, धावांच्या सरी नक्कीच बरसल्या. संथ फलंदाजीतही मयांक अगरवालचे सलग दुसरे शतक आणि चेतेश्वर पुजारा,  कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक याच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात गुरुवारी पहिल्या  दिवस अखेरीस 3 बाद 273 धावा केल्या.

INDvsSA : मयांक अगरवाल म्हणजे फक्त Quality!

पावसाचा अंदाज केवळ अंदाज राहिला. पण, दिवस अखेर खेळ अपुऱ्या प्रकाशामुळेच थांबवावा लागला. खेळ थांबला तेव्हा कर्णधार विराट कोहली 63, तर अजिंक्य रहाणे 18 धावांवर खेळत होता. मयांक अगरवालने शानदार 108 धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून तीनही बळी कागिसो रबाडा याने मिळविले.  

खेळपट्टीचा रंग  आणि एकूण पावसाळी हवामान लक्षात घेत भारतीय संघात या  सामन्यासाठी एक बदल करण्यात आला. वेगवान गोलंदाज उमेश यादवला संधी  देताना हनुमा विहारीला वगळण्यात आले. त्याचवेळी दक्षिण आफ्रिका संघानेही संघात एक बदल करताना डेन पीएड्ट याला वगळून अॅन्रिच नॉर्टे  याला पदार्पणाची संधी दिली. 

नाणेफेकीचा अपेक्षित कौल मिळाल्यावर भारतीय कर्णधार विराट कोहली याने फलंदाजीचा अपेक्षित निर्णय घेतला. त्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर खेळाडूंच्या संयमाची कसोटी लागली. यात निश्चितच  भारतीय  एक  पाऊल पुढे राहिले. याचे प्रमुख श्रेय  मयांक अगरवालला जाते. संयम पाळूनही झटपट धावा  करता येतात हेच त्याच्या शतकी खेळीत दिसून आले. त्याने 195 चेंडूंचा सामना करताना 15चौकार आणि दोन षटकारांसह 108 धावांची खेळी केली. मयांकचे  शतक हेच पहिल्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. पावसाने बगल दिली असली, तरी अखेरच्या सत्राचा खेळ सुरू असताना प्रकाशझोत सुरू करावे लागले.
मयांकची  बाजी

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे मैदान मुळात फलंदाजीसाठी लक्षात राहते. सुरुवातीचा काही काळ सोडल्यास खेळपट्टीवर फलंदाजांचेच राज्य राहते. पण,फलंदाजांना तेवढा संयम राखणे आवश्यक असते. हा संयम मयांकने कमालीचा दाखवला. रोहित शर्मा आपली पहिल्या कसोटीची झलक दाखवू शकला नाही. सकाळच्या सत्रात गोलंदाजांना मिळणाऱ्या  बाऊन्सचा तो बळी ठरला. चेंडू उसळल्यावर तो अंगावर घेत खेळण्याच्या नादात चेंडूने बॅटची कड  घेतली आणि यष्टिमागे डी कॉकने आपले काम केले.

मयांकचा माईलस्टोन; आता सचिन, सेहवागच्या पंक्तीत

त्यानंतर मयांक आणि चेतेश्वर पुजारा यांनी चिवट फलंदाजी करून कुठेही गोलंदाज वरचढ  ठरणार नाहीत याची काळजी घेतली. मयांकपाठोपाठ संथ सुरुवातीनंतर पुजाराने आपले अर्धशतक पूरे केले. पण, खेळपट्टीवर टिच्चून उभा राहणारा पुजारा रबाडाच्या एका बाहेर जाणाऱ्या  चेंडूचा बळी ठरला. बॅट काढून घेण्याच्या नादात चेंडूने बॅटची कड घेतली आणि स्लिपमध्ये डु प्लेसीने त्याचा झेल पकडला. अर्थात, तोपर्यंत मयांक-पुजारा जोडीने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना थकवण्याचे काम पार पाडले होते. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केली. 

संथ  फलंदाजीएकूणच भारतीय संघाने पहिल्या दिवशी फारसा धोका पत्करला नाही. षटकामागे साधारण तीनच्या धावगतीनेच त्यांनी फलंदाजी केली. यातही मयांक थोडासा अपवाद ठरला. त्याने संयमाला आक्रमकतेची सुरेख जोड  देत  आपले सलग दुसरे शतक साजरे केले. शतकापर्यंत सावध मजल मारणाऱ्या मयांकने शतकाजवळ आल्यावर मात्र फिरकी गोलंदाज महाराजचा समाचार घेत त्याला सलग दोन षटकार ठोकले. त्यानंतर फिलॅंडरच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत त्याने शतक साजरे केले. पण, या वेळी शतकाचे रुपांतर मोठ्या शतकात करू शकला नाही. पुन्हा एकदा रबाडाने दक्षिण आफ्रिकेला ब्रेक थ्रू मिळवून दिला. चेंडू दाबून खेळण्याचा मयांकचा प्रय़त्न फसला आणि बॅटची कड घेऊन गेलेला चेंडू पुन्हा एकदा प्लेसीच्या हातात विसावला. 

त्यानंतर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी देखील संथ फलंदाजी केली. ढगाळ हवामानात चुकून जरी विकेट गेली असती, तर भारताला फटका बसेल असा त्यांचा विचार नक्कीच योग्या ठरला. खाते उघडण्यास वेळ घेणाऱ्या कोहलीने आपल्या कर्णधारपदाच्या 50व्या सामन्यात अर्धशतक झळकाविले. रहाणेने देखील खाते उघडण्यास वेळल घेत कर्णधाराला साथ केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India scored 273 runs on day one against south africa in 2nd test