INDvsSA : मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल; कोहलीला रहाणेची सुरेख साथ

India Scores 356 runs on day 2 against South Africa in Pune
India Scores 356 runs on day 2 against South Africa in Pune

पुणे : कर्णधार विराट कोहलीचे शानदार शतक आणि त्याला उपकर्णधार अजिंक्य रहाणेकडून मिळालेली सुरेख साथ याच्या जोरावर भारताने शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा भारताने पहिल्या डावात 3 बाद 356 धावा केल्या होत्या.  कोहली 104, तर रहाणे 58 धावावंर खेळत होता.

पुणे शहर आणि अगदी या वेळी गहुंजे येथील मैदान परिसराला गुरुवारी रात्री पावसासने झोडपले. शहर तसेच मैदानाच्या परिसरात ठिकठिकाणी पाणी साचलेले दिसून येत होतो. यानंतरही मैदानावरील सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ वेळेवर सुरू झाला. पाण्याचा निचरा होण्यासाठी मैदानावर असलेल्या सर्वोच्च दर्जाच्या सुविधेमुळेच हे शक्य झाले.

दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर वेगवान गोलंदाजांना मिळणारी साथ यामुळे कोहली आणि रहाणे यांना खेळणे कठिण जात होते. अचूक टप्पा आणि दिशा राखून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदजांनी मारा केला. मात्र, कोहली, रहाणे जोडीने त्यांना दाद दिली नाही. बॅटची कड घेऊन गेलेले दोन तीन चौकार वगळता या दोन्ही फलंदाजांचा खेळ त्यांच्या लौकिकास साजेसा असाच होता. खेळपट्टीवर पाय रोवून उभे रहायचे आणि धावफलकावर मोठी धावसंख्या उभी करण्याचे त्यांचे इरादे स्पष्ट होते.

दुसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रातही भारताची फलंदाजी संथ दिसून आली असली, तरी त्यात सावधपणा होता. धाव घेण्याची घाई देखील त्यांनी केली नाही. फिलॅंडर, रबाडा आणि नॉर्टे या वेगवान गोलंदाजांना प्रयास करूनही भारतीय फलंदाजांना बाद करण्यात यश आले नाही. केशव महाराज आणि मुथ्थुस्वामी ही फिरकी जोडीही अपयशी ठरली. वेगवान गोलंदाजांच्या दिशा बदलूनही दक्षिण आफ्रिकेच्या पदरी काहीच पडले नाही.

कोहलीने उपाहाराच्या काही वेळ आधी फिलॅंडरला स्ट्रेट ड्राईव्हचा चौकार लगावत कारकिर्दीतले 26वे शतक साजरे केले. रहाणेने देखील आपला फॉर्म कायम असल्याचे दाखवून दिले. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 158 धावांची भागीदारी केली. कसोटीवर भारताचे वर्चस्व राहणार हे या भागीदारीने निश्चित केले आहे. फक्त आता रहाणे शतक करणार का आणि भारत किती धावसंख्या उभारणार हे उर्वरित दिवसाच्या खेळाचे सार राहिल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com