आता विश्‍वकरंडक कबड्डीचा असली पंगा

शैलेश नागवेकर : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016


विनोदी पत्रकार परिषद
उपांत्य फेरीत खेळणाऱ्या चारही संघांचे कर्णधार अनुप कुमार (भारत), मेराज शेख (इराण), खोमसान (थायलंड) आणि डॉंग ज्यून हॉंग (कोरिया) हे व्यासपीठावर होते. यातील कोणालाही इंग्रजी बोलता येत नाही. अनुपला इंग्रजी केवळ कळते. इतर कर्णधारांसोबत दुभाषी होते; पण हे कर्णधार काय बोलत होते, हे एकमेकांना कळत नव्हते. कोरिया, इराणी, थाई भाषा पत्रकारांना कळत नसल्याने केवळ चेहऱ्यावरच्या हावभावावरून अंदाज बांधण्याचा प्रकार सुरू होता. इराण हे शब्द कानी पडले की मेराज केवळ स्मित हास्य करत होता. अनुप मात्र या सर्व भाषेच्या "कबड्डीचा' आनंद घेत होता.

अहमदाबाद : अंतिम टप्प्यातील साखळी सामन्यात अपेक्षेप्रमाणे घडल्यानंतर विश्‍वकरंडक कबड्डी स्पर्धा निर्णायक मुकाबल्यासाठी सज्ज आहे. एकंदरीत चित्र पाहता भारताचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्‍चित आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी कोण, याची उत्सुकता उद्याच्या (ता. 21) उपांत्य सामन्यात असेल.

भारताची एकूणच ताकद आणि थायलंडला बुधवारी विजयासाठी करावे लागलेले निकराचे प्रयत्न लक्षात घेता, भारताला उपांत्य लढत जिंकणे अवघड नसेल; मात्र इराणसाठी कोरियाचे आव्हान सोपे नसेल. भारताविरुद्धची लढत टाळण्यासाठी इराणने पोलंडविरुद्ध पराभव स्वीकारला आणि कोरियाशी सामना करणे पसंत केले. या प्रकारामुळे दुखावलेले कोरिया जखमी वाघाप्रमाणे त्यांच्यावर तुटून पडतील. या प्रकाराचा बदला त्यांनी घेतला तर आश्‍चर्य वाटायला नको.

इराणचा संघ सर्व साखळी सामने हातचे राखून खेळला. त्यामुळे ऐनवेळी खेळ उंचावण्यासाठी त्यांच्यासाठी सोपे नसेल, तर भारताला सलामीला धक्का दिल्यामुळे कोरियाचा आत्मविश्‍वास उंचावला असेल. कोरियाचा हुकमी खेळाडू यान कून ली याला प्रो कबड्डीमुळे इराणचे प्रमुख खेळाडू मेराज शेख आणि फझल अत्राचली पुरेपूर जाणतात. यान कुन ली याला शह देण्याचे तंत्र त्याच्याकडे आहे. दोन्ही संघांच्या क्षमतेचा विचार केला तर इराणचे पारडे जड आहे; पण एखादी चूक त्यांना स्पर्धेतून बाहेर काढू शकते.

इराणऐवजी थायलंडचा सामना उपांत्य फेरीत असल्यामुळे भारतीय गोटातीलही चिंता कमी झाली आहे. साखळी सामन्यातून भारताने सर्व खेळाडूंना आलटून पालटून संधी दिल्यामुळे सर्व खेळाडू लढतीसाठी सज्ज आहेत. उपांत्य फेरीचा सामना निर्णायक असल्यामुळे प्रयोग सावधपणे होतील. बहुदा सुरवातीचाच संघ कायम राहील. एखाद्‌-दुसरा बदल होऊ शकतो, असे अनुपने सांगितले.

प्रदीप नरवाल आणि अजय ठाकूर हे चढाईपटू फॉर्मात असल्यामुळे तुझ्यावरचे दडपण कमी झाले आहे का, या प्रश्‍नावर अनुपने होकारार्थी उत्तर दिले. मी संघाला एकत्रित ठेवून कामगिरी करून घेण्याची भूमिका करत आहे. गरज भासल्यास चढाईस सज्ज असेनच, असे तो म्हणाला.

थायलंडचा कर्णधार खोमसान थॉंगखाम याच्यावर थायलंडची मोठी मदार आहे. या स्पर्धेत त्याने चढायांचे अर्धशतकही पूर्ण केले आहे; पण जपानने त्याच्या तीन सुपर कॅच केल्या होत्या. त्यामुळे भारताविरुद्ध त्याचे नाणे किती चालेल हे सांगणे कठीण आहे.

सावधगिरी आवश्‍यक
भारताला थायलंडपेक्षा स्वतःच्या अतिआत्मविश्‍वासापासून सावध राहावे लागेल. कोरियाविरुद्ध सलामीला हाच अतिआत्मविश्‍वास नडला होता. त्यामुळे आता भारतीय संघ ताकही फुंकून पिणार हेच नक्की.

आजच्या लढती
इराण वि. कोरिया (रात्री 8 पासून), भारत वि. थायलंड (रात्री 9 पासून)

Web Title: India to take on Thailand in World Cup Kabaddi