
IND vs AUS 2nd Test : पहिला दिवस संपला! भारताची सलामी जोडी सलामत, ऑस्ट्रेलिया 263 धावात गारद
IND vs AUS 2nd Test Day 1 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 263 धावांवर संपुष्टात आला. भारतीय गोलंदाजांसमोर कांगारूंच्या फलंदाजांनी पहिल्याच दिवशी नांगी टाकली. मात्र याला उस्मान ख्वाजा आणि पीटर हँड्स्कम्ब अपवाद राहिले. सलामीवीर ख्वाजाने 81 तर पीटरने नाबाद 72 धावांची खेळी केली. भारताकडून मोहम्मद शमीने 4 तर रविंद्र जडेजा आणि अश्विनने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
भारताने पहिल्या दिवशी आपल्या पहिल्या डावात 9 षटकात नाबाद 21 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा 13 तर केएल राहुल 4 धावा करून नाबाद राहिले.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 263 धावात संपुष्टात
246-9 : शमीने नॅथन लयॉनला दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता
मोहम्मद शमीने नॅथन लयॉनला 10 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला 9 वा धक्का दिला.
227-7 : अखेर जडेजाने जोडी फोडली
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि पीटर हँड्स्कॉम्ब यांनी सातव्या विकेटसाठी 59 धावांची झुंजार भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला द्विशतकी मजल मारून दिली. हँड्स्कॉम्बने झुंजार अर्धशतक केले तर त्याला 33 धावा करून कमिन्सने चांगली साथ दिली. अखेर जडेजाने कमिन्सला बाद करत ही जोडी फोडली.
168-6 : @100 अश्विनचा माईलस्टोन
अश्विनने कसोटीतील आपली 100 वी ऑस्ट्रेलियन शिकार केली. त्याने अॅलेक्स केरीला शुन्यावर बाद करत कांगारूंची अवस्था 6 बाद 168 धावा अशी केली.
167-5 : केएल राहुलच्या भन्नाट कॅचने संपली ख्वाजाची झुंजार खेळी
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने 81 धावांची झुंजार खेळी करत कांगारूंना 150 धावांपर्यंत पोहचवले होते. मात्र रविंद्र जेडाजाने त्याला केएळ राहुल करवी झेलबाद करत त्याची झुंजार खेळी संपवली. राहुलने पॉईंटला भन्नाट कॅच घेतला.
108-4 : ट्रॅव्हिस हेडची शमीने केली शिकार
लंचनंतर भारताने ऑस्ट्रेलियाला अजून एक धक्का दिला. मोहम्मद शमीने ट्रॅव्हिस हेडला 12 धावांवर बाद करत कांगारूंचा चौथा फलंदाज माघारी धाडला.
91-3 : अश्विनने दिले पाठोपाठ दोन धक्के
वॉर्नर बाद झाल्यानंतर मार्नस लाबुशाने आणि उस्मान ख्वाजा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र लंचसाठी काही अवधी राहिला असतानाच अश्विनने मार्नसला 18 तर स्टीव्ह स्मिथला शुन्यावर बाद करत कांगारूंची अवस्था 1 बाद 91 वरून 3 बाद 91 अशी केली.
50-1 (15.2 Ov) : मोहम्मद शमीने वॉर्नरची संथ खेळी संपवली
डेव्हिड वॉर्नरने 21 व्या चेंडूवर खाते उघडल्यावर आपली धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याने उस्मान ख्वाजाच्या साथीने ऑस्ट्रेलियाला 50 धावांपर्यंत पोहचवले. मात्र अखेर मोहम्मद शमीने वॉर्नरची 44 चेंडूत केलेली 15 धावांची खेळी संपवली.
AUS 21/0 (7.2) : डेव्हिड वॉर्नरची सावध सुरूवात
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात सावध सरूवात केली. त्याने 14 चेंडू खेळून देखील आपले खाते उघडले नव्हते. अखेर त्याने 21 व्या चेंडूवर 2 धावा घेत आपले खाते उघडले. त्यासाठी त्याला 7 षटके वाट पहावी लागली.
चेतेश्वर पुजाराचा 100 वा कसोटी सामना
भारताची आधुनिक भींत म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा आज आपला 100 वा कसोटी सामना खेळणार आहे.
भारतीय संघात एक बदल
रोहित शर्माने आपल्या संघात एक बदल केला असून मधल्या फळीत सूर्यकुमार यादवच्या ऐवजी श्रेयस अय्यरचा समावेश करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कांगारूंनी आपल्या संघात दोन बदल केले आहेत. रेनशॉच्या जागी ट्रव्हिस हेडला संधी मिळाली आहे. तर डावखुरा फिरकी गोलंदाज मॅथ्यू कूहनमन पदार्पण करणार आहे.