
India vs Bangladesh FIFA World Cup 2026 Qualifier भारताने सामन्यावर वर्चस्व राखले, पण अनुभवी सुनील छेत्रीसह खेळाडूंना संधी साधता आल्या नाहीत, परिणामी सौदी अरेबियात २०२७ साली होणाऱ्या आशिया करंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीत बांगलादेशविरुद्ध गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले.
पात्रतेच्या तिसऱ्या फेरीतील क गट सामना जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. भारत व बांगलादेश यांच्यातील २९व्या आंतरराष्ट्रीय लढतीतील ही अकरावी बरोबरी ठरली, तर मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली भारताला सहापैकी चौथ्या लढतीत बरोबरीवर समाधान मानावे लागले. क गटातील भारताचा पुढील सामना हाँगकाँगविरुद्ध १० जून रोजी खेळला जाईल. मंगळवारी या गटात झालेला सिंगापूर व हाँगकाँग यांच्यातील सामनाही गोलशून्य बरोबरी राहिला. त्यामुळे गटातील चारही संघांच्या खाती आता प्रत्येकी एक गुण आहे.