esakal | महिला विश्‍वकरंडक हॉकी भारताचा पराभव
sakal

बोलून बातमी शोधा

India vs England, Women's Hockey World Cup

अखेरच्या काही मिनिटांत इंग्लंडकडून होणारे आक्रमण आणि परिणामी मिळत गेलेले पेनल्टी कॉर्नर यामुळे दडपण आलेल्या भारताला महिला विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेत अखेर 1-1 बरोबरीवर समाधान मानावे लागले. अखेरच्या काही सेकंदांत तर 10 खेळाडूंसह खेळावे लागले होते. आठ वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या भारताला विजयापासून अखेर दूरच राहावे लागले. 

महिला विश्‍वकरंडक हॉकी भारताचा पराभव

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडन - अखेरच्या काही मिनिटांत इंग्लंडकडून होणारे आक्रमण आणि परिणामी मिळत गेलेले पेनल्टी कॉर्नर यामुळे दडपण आलेल्या भारताला महिला विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेत अखेर 1-1 बरोबरीवर समाधान मानावे लागले. अखेरच्या काही सेकंदांत तर 10 खेळाडूंसह खेळावे लागले होते. आठ वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या भारताला विजयापासून अखेर दूरच राहावे लागले. 

जागतिक क्रमवारीत इंग्लंड दुसऱ्या; तर भारत 10 व्या स्थानावर आहे. 10 हजार प्रेक्षकांच्या साक्षीने झालेल्या या सामन्यात इंग्लंडचे आक्रमण कमालीचे वेगवान होते. संपूर्ण सामन्यात त्यांना नऊ पेनल्टी कॉर्नर मिळाले. अखेरच्या पेनल्टी कॉर्नरवर त्यांनी संधी साधली. अखेरची 90 सेकंद असताना नवनीतला पिवळे कार्ड दाखविण्यात आले, त्यामुळे 10 खेळाडूंसह खेळावे लागण्याची वेळ आली होती. 

भारतीय गोलरक्षक सविताचे गोलरक्षण लक्षवेधक होते. पहिल्या मिनिटापासून तिच्या क्षमतेची कसोटी पणास लागली होती. प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा लाभल्यामुळे इंग्लंडने सुरुवातीपासूनच हल्लाबोल केला आणि दुसऱ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला होता. सविताच्या भक्कम गोलरक्षणानंतर भारताने प्रतिआक्रण केले. भारताच्या या आक्रमणामुळे इंग्लंडचा बचाव सैरभैर झाला. भारतालाही पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण गोल होत नव्हते. 

दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये इंग्लंडला पेनल्टी स्ट्रोक देण्यात आला. भारतीय खेळाडूच्या शरीराला चेंडू लागल्याचे रेफ्रींचे म्हणणे होते; परंतु व्हिडिओ पंचांची मदत घेतली असता, रेफ्रींना निर्णय फिरवावा लागला आणि भारतीयांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. हीच संधी साधून भारतीयांनी आक्रमणातील धार वाढवली आणि नेहा गोयतने 26 व्या मिनिटाला गोल केला. 

भारताने केलेल्या या हल्ल्यामुळे पायाखालची जमीन सरकलेल्या इंग्लिश महिलांनी आक्रमणाची मालिका सुरुवात केली, त्यामध्ये त्यांना पेनल्टी कॉर्नरही मिळत गेले. या वेळी सवितावर गोलरक्षणाची जबाबदारी वाढत गेली; परंतु अखेरच्या पेनल्टी कॉर्नरवर सविताने चेंडू अडवलाही होता, परंतु दीपिकाच्या एका चुकीने इंग्लंडला गोल करण्याची संधी मिळाली. लीली ओस्लीने हा बरोबरीचा गोल केला.

loading image
go to top