IND VS SA : धावांची लूट अन् सुमार क्षेत्ररक्षणामुळे पराभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shikhar dhawan

IND VS SA : धावांची लूट अन् सुमार क्षेत्ररक्षणामुळे पराभव

लखनौ : भारतीय संघाला लखनौ येथील पहिल्या एकदिवसीय लढतीत ९ धावांनी हार सहन करावी लागली. यामुळे निराश झालेल्या टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवन याने या पराभवाचे खापर अखेरच्या षटकात करण्यात आलेली धावांची लूट व सुमार क्षेत्ररक्षणावर फोडले.

धवन या वेळी म्हणाला, येथील खेळपट्टीवर चेंडूंना स्वींग मिळत होता. चेंडूला वळण मिळत होते. अशा परिस्थितीतही दक्षिण आफ्रिकेने २५० धावा फटकावल्या. या अधिक धावा होत्या. अखेरच्या षटकांमध्ये पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्यांकडून धावाच धावा फटकावण्यात आल्या. क्षेत्ररक्षणही अव्वल दर्जाचे नव्हते. या लढतीमुळे खूप काही शिकायला मिळाले, असे धवनने पुढे नमूद केले.

दोन शॉर्टस्‌ कमी पडले : संजू

संजू सॅमसनने टीम इंडियाच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्याने अवघ्या ६३ चेंडूंमध्ये ९ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ८६ धावांची खेळी साकारली, पण भारताचा ९ धावांनी पराभव झाला. पराभवानंतर सॅमसन म्हणाला, भारतासाठी मैदानात उतरायला नेहमीच आवडते. सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरलो होतो अन्‌ विजयासाठीच खेळत होतो. विजयासाठी दोन फटके (शॉट्स) कमी पडले. पुढच्या लढतीत ही कसर भरून काढीन, पण संघासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आनंदी आहे, असे त्याने स्पष्ट केले.