IND vs WI : पूर्ण सरावासाठी भारतीय प्रयत्नशील; दुसऱ्या सामन्यातही वर्चस्वासह ५० षटके फलंदाजीवर भर

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आता मोजके सामने दूर असताना भारतासाठी एक सामना वाया गेला.
 india vs west indies live score odi ind vs wi live cricket full scorecard barbados
india vs west indies live score odi ind vs wi live cricket full scorecard barbadosSakal

बार्बाडोस : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आता मोजके सामने दूर असताना भारतासाठी एक सामना वाया गेला. अर्ध्या षटकांचाच सामना झाल्यानंतर आता उद्या होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात किमान व्यवस्थित फलंदाजी मिळेल, अशी आशा रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन करत आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या हेलकावे खात असलेल्या वेस्ट इंडीजने गुरुवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सपशेल शरणागती स्वीकारली. त्यांनी उभारलेल्या जेमतेम ११४ धावा भारतीयांनी २२ षटकांत पार केल्या. यासाठी त्यांना पाच विकेट गमवावे लागले असले तरी विराट कोहलीला फलंदाजी मिळाली नाही. रोहित शर्मा मोजकेच चेंडू खेळला. हा सामना दोन्ही मिळून ४५.५ षटकांत संपला होता.

आता विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत भारतासाठी ११ सामने शिल्लक आहेत, त्यातील दोन सामने वेस्ट इंडीजविरुद्धच्या या मालिकेतील आहेत. वेस्ट इंडीज फलंदाजीची अशीच परिस्थिती राहिली तर भारतीयांना फलंदाजीचा पुरेसा सराव मिळणार नाही.

बार्बाडोसच्या ज्या मैदानावर पहिला सामना झाला तेथेच उद्या दुसराही सामना आहे. ही खेळपट्टी फलंदाजीस उपयुक्त नव्हती. फिरकी गोलंदाजांचे कमालीचे वर्चस्व होते. म्हणून ११५ धावा करताना भारताने ५ विकेट गमावले होते.

इतर फलंदाजांना सराव मिळावा म्हणून फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करण्यात आले होते; परंतु इशान किशनचा अपवाद वगळता इतरांनी निराशा केली. अखेर रोहित शर्माला सातव्या क्रमांकावर फलंदाजीस यायला लागले.

विराट कोहलीला तर तीही संधी मिळाली नाही. उद्याचा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याबरोबर भारतीय सरावाची जास्तीत जास्त संधी मिळवण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी नाणेफेक जिंकली तर प्रथम फलंदाजीचा पर्याय निवडला जाईल. त्यामुळे किमान ५० षटकांच्या फलंदाजीचे उद्दिष्ट राखता येईल.

कुलदीपची प्रभावी फिरकी

चायनामन कुलदीप यादवची फिरकी पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीज फलंदाजांना कळलीच नाही. पहिल्या सामन्यातील या अनुभवातून त्यांच्यात लगेचच सुधारणा होईल, असे वाटत नाही. त्यामुळे उद्याच्या सामन्यातही कुलदीपचा सामना करणे यजमान फलंदाजांना सोपे नसेल. मात्र सर्वांना सराव देण्याचा विचार झाला तर उद्या कुलदीपऐवजी युझवेंद्र चहलला संधी मिळू शकते, दुसऱ्या बाजूने रवींद्र जडेजाचे स्थान कायम राहील.

हार्दिकसाठी सराव महत्त्वाचा

हार्दिक पंड्या आयपीएलनंतर थेट आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. कालच्या सामन्यात त्याने नव्या चेंडूवर गोलंदाजी केली. तीन षटकांत १७ धावांत १ विकेट अशी कामगिरी करत लय मिळवण्याचा प्रयत्न केला; परंतु फलंदाजीत त्याला चमक दाखवता आली नाही.

त्यात त्याचा दोष नव्हता. इशान किशनने मारलेला चेंडू थेट समोरच्या यष्टींवर लागला आणि क्रीजबाहेर असल्यामुळे हार्दिक धावचीत झाला; परंतु आयपीएलमध्येही हार्दिकला विशेष धावा करता आल्या नव्हत्या. उद्या सामन्याच्या परिस्थितीनुसार त्याला फलंदाजीच्या क्रमवारीत बढती मिळू शकते. सूर्यकुमार यादवसाठी एकेक संधी कमी होत आहे.

पहिल्या सामन्यात २५ चेंडूंत १९ अशी त्याने सुरुवात केली खरी; परंतु मोठी खेळी करून संघातले स्थान कायम करण्याची संधी गमावली. केएल राहुल किंवा श्रेयस अय्यर संघात परतल्यावर सूर्यकुमारला जागा खाली करावी लागू शकते. त्याअगोदर आपले स्थान त्याला पक्के करावे लागणार आहे.

भारत-वेस्ट इंडीज ः

आज दुसरा सामना

वेळ ः सायंकाळी ७ पासून ः थेट प्रक्षेपण ः फॅन कोड, जिओ सिनेमा, डीडी स्पोर्टस्

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com